पल्लेकेले West Indies Won after 19 Years : श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर, वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं तिसरा आणि शेवटचा वनडे सामना जिंकून या मालिकेत क्लीन स्वीप होण्यापासून स्वतःला वाचवलं आहे. पल्लेकेलेच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला, ज्यामुळं श्रीलंकेच्या संघाने 23 षटकांत 156 धावा केल्या आणि नंतर डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजला 195 धावांचं लक्ष्य गाठावं लागलं. वेस्ट इंडिज संघानं 22 षटकांत अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात हे यश संपादन केलं. ज्यात एविन लुईसनं फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली.
तीन वर्षांनंतर पुनरागमन करत झळकावलं शतक : एविन लुईसला तीन वर्षांनंतर वेस्ट इंडिजकडून वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. ज्याचा त्यानं पुरेपूर फायदा उठवला आणि 61 चेंडूत 102 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी लुईसला शेरफेन रदरफोर्डची साथ लाभली त्यानं 26 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं नाबाद 50 धावांची खेळी केली. या वनडे मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात वेस्ट इंडिजला एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेच्या संघावर पूर्ण वर्चस्व ठेवलं.