मेलबर्न WBBL Live Streaming in India : येत्या तीन ते चार महिन्यांत ऑस्ट्रेलियात क्रिकेटच्या अनेक मोठ्या स्पर्धा होणार आहेत. एकीकडे भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबरच्या अखेरीस कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात असताना दुसरीकडं आज म्हणजेच 27 ऑक्टोबरपासून फ्रँचायझी आधारित बिग बॅश लीगचा 10वा महिला हंगाम सुरु झाला आहे. यावेळी महिला बिग बॅश लीगच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या ॲडलेड स्ट्रायकर्सचा सामना गत हंगामातील उपविजेत्या ब्रिस्बेन हीटशी होणार आहे. यावेळी भारतीय महिला संघातील 6 खेळाडूही बिग बॅश लीगच्या मोसमात खेळताना दिसणार आहेत. वेगवान गोलंदाज शिखा पांडे बिग बॅश लीगमध्ये प्रथमच ब्रिस्बेन हीटकडून खेळणार आहे.
शिखाशिवाय हे भारतीय खेळाडूही खेळताना दिसणार : WBBL च्या या 10व्या हंगामात, शिखा पांडे ब्रिस्बेन हीटकडून खेळत असताना, जेमिमाह रॉड्रिग्स देखील त्याच संघाचा एक भाग आहे. भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना ॲडलेड स्ट्रायकर्स संघाचा भाग आहे. दीप्ती शर्मा आणि यास्तिका भाटिया मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळताना दिसतील, तर पर्थ स्कॉचर्सनं डेलन हेमलथा यांचा समावेश केला आहे. शिखा व्यतिरिक्त इतर भारतीय खेळाडू अद्याप या मोसमात सहभागी होण्यासाठी आलेले नाहीत कारण या सर्व खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला संघाचा भाग आहेत, ज्यामध्ये ही मालिका संपल्यानंतर हे सर्व खेळाडू सहभागी होतील.