गॉल Usman Khawaja : काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये धावा काढण्यात अपयशी ठरलेल्या उस्मान ख्वाजानं श्रीलंकेत येताच त्याचं पहिलं कसोटी द्विशतक झळकावलं आहे. ही खेळी देखील विक्रमी आहे कारण श्रीलंकेत कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजानं झळकावलेलं हे पहिलंच द्विशतक आहे. आउट होण्यापूर्वी उस्मान ख्वाजानं 352 चेंडूत 232 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली.
सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी : ख्वाजानं त्याच्या द्विशतकी खेळीदरम्यान फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगलं कौशल्य दाखवलं. अचूकतेनं स्वीप आणि रिव्हर्स-स्वीप मारले.उस्मान ख्वाजानं 38 वर्षे 43 दिवसांच्या वयात द्विशतक झळकावून एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर केला. 38 वर्षे किंवा त्याहून अधिक वयात द्विशतक करणारा ख्वाजा आता सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. उस्मान ख्वाजानं 290 चेंडूत 16 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं आपलं द्विशतक पूर्ण केलं, जे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिलंच द्विशतक आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडसोबत सलामीला आलेला उस्मान ख्वाजानं दुसऱ्या दिवशी तसंच पहिल्या दिवशीही उत्तम लयीत खेळ केला. बीजीटीमध्ये पहिल्या तीन सामन्यांमध्ये उस्मान ख्वाजा पूर्णपणे अपयशी ठरला. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्यानं काही धावा केल्या असल्या तरी, संपूर्ण मालिकेत तो 200 धावांचा टप्पाही गाठू शकला नव्हता. त्यानं 5 सामन्यांच्या 10 डावात एकूण 184 धावा केल्या, ज्याची सरासरी 20.44 होती.
टीकाकारांना चोख उत्तर : 2016 मध्ये, डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजा याच मैदानावर एकाच दिवशी दोनदा बाद झाला होता. उस्मान ख्वाजा फिरकी गोलंदाजी खेळू शकत नाही असं म्हटलं जात होतं, पण आता तो 2025 मध्ये फिरकी गोलंदाजीवर वर्चस्व गाजवत आहे आणि श्रीलंकेत कसोटीत द्विशतक करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे. मालिकेपूर्वी त्यानं निवृत्तीबाबत एक विधानही दिलं होतं आणि म्हटलं होतं की जर ऑस्ट्रेलियन संघाला वाटत असेल की त्याची गरज नाही तर तो कसोटी क्रिकेट सोडेल. मात्र आता त्यानं द्विशतक झळकावून सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे.