नवी दिल्ली : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (8 डिसेंबर) भारत आणि बांगलादेश यांच्यात अंडर-19 आशिया चषक 2024 चा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेश संघानं भारतीय संघाचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. बांगलादेश संघानं प्रथम फलंदाजी करत 49.1 षटकात 10 गडी गमावून 198 धावा केल्या होत्या. बांगलादेशनं दिलेल्या 199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 32.2 षटकात 139 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशनं हा सामना 59 धावांनी जिंकला.
भारताच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी : बांगलादेशनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 35.2 षटकात 139 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात भारताची फलंदाजी फ्लॉप ठरली. एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी सलामीला आले. मात्र, हे दोन्ही फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. भारताला पहिला धक्का आयुष म्हात्रेच्या रूपानं 4 धावांवर बसला. आयुष 1 धावा करून बाद झाला. कर्णधार मोहम्मद अमाननं सर्वाधिक 26 धावांची खेळी केली. त्यानं या सामन्यात केवळ 40 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. वैभव सूर्यवंशीही केवळ 9 धावा करू शकला. हार्दिक राजनं 24, केपी कार्तिकेयननं 21 आणि आंद्रे सिद्धार्थनं 20 धावा केल्या.