मुंबई Team India Victory Parade : टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरणाऱ्या विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम, चर्चगेट, मरिन ड्राईव्ह आणि नरिमन पॉईंट परिसरात चाहत्यांची गुरुवारी (4 जुलै) दुपारपासूनच गर्दी उसळली होती. यावेळी अंदाजे तीन लाखांपेक्षा अधिक संख्येनं आलेल्या क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीला हाताळताना पोलिसांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. तर सायंकाळी झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना एनसीपीए परिसरात सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. तर मिळालेल्या माहितीनुसार, रोड शो दरम्यान झालेल्या गर्दीत श्वास गुदमरल्यानं आठ ते दहा जण भोवळ आल्यानं त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं.
तगडा पोलीस बंदोबस्त :मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, कायदा आणि सुव्यवस्थेचे सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 300 पोलीस अधिकारी आणि 1 हजार पोलीस कर्मचारी तैनात होते. मुंबई पोलीस दलाच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या माहितीनुसार विमानतळापासून ते मरीन ड्राईव्हपर्यंत सुमारे 5 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. विजयोत्सवाचा साक्षीदार बनण्यासाठी लाखो चाहत्यांनी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून नरिमन पॉईंट ते मरीन लाईन्स परिसरात गर्दी केली होती. यात सुमारे चार लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमी येथे गोळा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. यावेळी झालेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. मरिन ड्राइव्ह येथे उसळणारा जनसागर पाहता मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे दुपारीच नागरिकांना मरिन ड्राईव्ह परिसरात न येण्याचे आवाहन केले. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हेदेखील मरिन ड्राईव्ह परिसरात हजर होते.
रोड शो नंतरची परिस्थिती काय? :या रोड शोसाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे चाहते मरीन ड्राईव्ह परिसरात जमा होतील, याची प्रशासनाला पूर्वकल्पना होती. वाहतूक पोलिसांकडून त्यादृष्टीनं या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले. पोलिसांनी योग्य प्रकारे गर्दीचे नियोजन करण्यात आल्याचे जाहीर केले. मात्र, या रोड शोनंतर मरीन ड्राईव्ह सारख्या अलिशान परिसरात चपलांचा खच, तुटलेल्या छत्र्या आणि रस्त्यावर फेकण्यात आलेल्या पाण्याच्या बॉटल्स बघायला मिळाल्या. त्यामुळं अनेकांकडून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
- मरिन ड्राइव्ह येथे झालेल्या तोबा गर्दीत भोवळ आलेल्या आणि जखमी झालेल्या नऊ जणांना जीटी रुग्णालयात दाखल केले होते. बहुतांश सर्वांचे एक्सरे काढण्यात आले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यामधील आठ जणांना घरी सोडण्यात आले.
पोलीस आयुक्तांची पोस्ट :रोड शो दरम्यान प्रशासनाच्या नियोजनावरुन अनेकजण प्रश्न उपस्थित करत असले तरी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी योग्यप्रकारे गर्दीचे व्यवस्थापन झाल्याचं म्हटलंय. तसंच याबद्दल त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं आभारदेखील मानलंय. त्यांनी एक्स मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले, " चॅम्पियन्सचे स्वागत करण्यासाठी अनेक चाहते श्वास रोखून वाट पाहत होते. आज एकप्रकारचे गर्दीचे व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापन पाहायला मिळाले. , सत्यनारायण, अनिल आणि सर्व अधिकाऱ्यांचे, पोलीस बंदोबस्तात असलेल्या कर्मचाऱ्यांनी खूप छान काम केले. हे कार्य पूर्ण करण्याकरिता मदत करण्यासाठी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार."
हेही वाचा -
- टीम इंडियाचा रोड शो, देशाच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेट प्रेमींची मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर प्रचंड गर्दी, टीम इंडियाला १२५ कोटींचा चेक प्रदान - Team India Road Show
- मरिन ड्राइव्हवर चाहत्यांची गर्दी : भारतीय संघाच्या विजय परेडसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था - TEAM INDIA VICTORY PARADE IN MUMBAI
- भारतीय क्रिकेट संघाचं मुंबई विमानतळावर चाहत्यांकडून जंगी स्वागत - Team India victory parade in Mumbai