नवी दिल्ली T20 World Cup 2024 : विश्वचषक टी20 क्रिकेट स्पर्धेतील सामना युगांडा आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात युगांडानं पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघावर 3 गडी राखून शानदार विजय मिळवला. दोन्ही संघामधील हा सामना अतिशय कमी धावसंख्येचा होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पापुआ न्यू गिनी संघाला केवळ 77 धावाच करता आल्या. त्यानंतर युगांडानं 7 गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला.
पापुआ न्यू गिनीच्या हिरी हिरीच्या सर्वाधिक 15 धावा :पापुआ न्यू गिनी संघाच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना केवळ 77 धावा केल्या. यात हिरी हिरीनं सर्वाधिक 15 धावा केल्या. त्याच्याशिवाय लेगा सियाका आणि किपलिन डोरिगा या दोन फलंदाजांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. दुसरीकडं युगांडाच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. जुमा कियागीनं 4 षटकात केवळ 10 धावा देत 2 फलंदाजांना तंबूची वाट दाखवली.