T20 World Cup : टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय क्रिकेट संघाला फक्त एकदाच चषक जिंकता आलाय. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 मध्ये पुन्हा एकदा चषक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 आवृत्त्यांपैकी भारताकडे फक्त एकदाच 2007 मध्ये विश्वचषक जिंकता आला आहे. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या उद्घाटनाच्या आवृत्तीपासून ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये होणाऱ्या आगामी नवव्या आवृत्तीपर्यंतच्या स्पर्धेच्या 17 वर्षांच्या इतिहासातील भारताच्या प्रवासावर एक नजर टाकूया.
धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला विश्वचषक : टी-20 विश्वचषक 2007 च्या भारतीय संघात अनेक वरिष्ठ खेळाडू होते. मात्र तरीही धोनीकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली होती. 2007 विश्वचषकात युवा आणि वरिष्ठ खेळाडूंच्या नेतृत्वाखाली संघानं ज्या पद्धतीनं कामगिरी केली. त्यामुळं सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. भारतानं पाकिस्तानचा पराभव करून टी-20 विश्वचषकाची ही पहिलीच आवृत्ती जिंकली.
टी-20 विश्वचषक 2007 मध्ये भारताचा प्रवास
- भारताचा पहिला सामना स्कॉटलंडविरुद्ध होता. हा सामना पावसामुळे रद्द झाला होता.
- पाकिस्तानसोबतच्या दुसऱ्या सामन्यात भारत 141 धावांवर बरोबरीत होता आणि भारताने तो अंडर बॉल आऊटमध्ये जिंकला होता.
- तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 10 धावांनी पराभव केला.
- चौथ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 18 धावांनी पराभव केला.
- भारतानं पाचव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 37 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
उपांत्य फेरीत भारताचा प्रवास :उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट गमावत 188 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 19.3 षटकांत 173 धावांत सर्व बाद झाला. भारतानं 15 धावांनी सामना जिंकून अंतिम फेरी गाठली.
भारत-पाकिस्तान फायनलमध्ये आमने-सामने:टी-20 विश्वचषक 2007 च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात धोनीच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट गमावत 157 धावा केल्या. भारतानं दिलेल्या 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 19.3 षटकांत 152 धावांत गारद झाला. या सामन्यात पाकिस्तानने 9 विकेट गमावल्या होत्या. मिसबाह उल हक क्रीजवर फलंदाजी करत होता. त्यावेळी भारताकडून जोगिंदर शर्मा गोलंदाजी करत होता. पाकिस्तानला विजयासाठी 3 चेंडूत 6 धावांची गरज होती. त्यानंतर जोगिंदरच्या चेंडूवर मिसबाहनं स्कूप शॉट खेळला मिसबाह उल हकला नशिबानं साथ दिली नाही. कारण तो चेंडू थेट श्रीशांतच्या हातात गेला. अशा प्रकारे भारत टी-20 विश्वचषक 2007 च्या पहिल्या आवृत्तीचा विजेता बनला.
टी-20 विश्वचषकात 2007 'या' खेळाडूंनी केली दमदार कामगिरी
- गौतम गंभीरनं 7 सामन्यात 3 अर्धशतकांसह 227 धावा केल्या.
- एमएस धोनीनं 7 सामन्यात 154 धावा केल्या.
- युवराज सिंगनं 7 सामन्यात 2 अर्धशतकांसह 148 धावा केल्या.
- वीरेंद्र सेहवागनं 6 सामन्यात 1 अर्धशतकासह 133 धावा केल्या.
- आरपी सिंगनं 7 सामन्यात 12 विकेट घेतल्या.
- इरफान पठाणनं 7 सामन्यात 10 विकेट घेतल्या.
- स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरला? : पाकिस्तानचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सत्रात टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. या स्पर्धेत त्यानं 7 सामन्यात 91 धावा करून एकूण 12 विकेट घेतल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आलं.
- या फलंदाजानं सर्वाधिक धावा केल्या :ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने 2007 च्या T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 6 सामन्यात 4 झंझावाती अर्धशतकांच्या मदतीने 265 धावा केल्या. या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 होती. या मोसमात त्याच्या बॅटमधून 32 चौकार आणि 10 षटकारही आले.
- या गोलंदाजानं सर्वाधिक विकेट घेतल्या : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलनं पहिल्या टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेतल्या. गुलनं 7 सामन्यात एकूण 13 विकेट घेतल्या. 25 धावांत 4 बळी ही त्याची या काळात सर्वोत्तम कामगिरी होती.
टी-20 विश्वचषकात भारताचा प्रवास
- विश्वचषक 2007 : भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले
- विश्वचषक 2009 : भारतीय संघ सुपर 8 मधून बाहेर पडला.
- विश्वचषक 2010 : भारतीय संघ सुपर 8 मधून बाहेर पडला.
- विश्वचषक 2012 : भारतीय संघ सुपर 8 मध्ये गेला पण उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला नाही.
- विश्वचषक 2014 : अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभूत.
- विश्वचषक 2016 : उपांत्य फेरीत प्रवेश केला पण वेस्ट इंडिजकडून पराभव झाला
- विश्वचषक 2020 : टीम इंडिया सुपर 12 मधून बाहेर पडली.
- विश्वचषक 2022 : उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ बाहेर पडला.
हेही वाचा