T20 World Cup IND vs ENG Semi Final :सुपर-8 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारताचा सामना इंग्लंडशी झाला होता. त्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता भारत या पराभवाचा बदला घेणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊया.
भारत-इंग्लंड किती वेळा आमने सामने :टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड आतापर्यंत 23 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये भारताचं वर्चस्व राहिलं आहे. भारतानं 12 सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर इंग्लंडनं 11 सामने जिंकले आहेत. आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड 4 वेळा भिडले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळं टी-20 विश्वचषकात दोन्ही संघांची कामगिरी समान आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी इंग्लंडपेक्षा चांगली राहिली आहे. भारतानं यंदाच्या टी-20 विश्वचषकात 7 सामन्यांपैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 1 सामना पावसामुळं अनिर्णित राहिला आहे. भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी प्रभावी ठरली आहे. त्यामुळं इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारत जिंकेल, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींना आशा आहे.
पावसामुळं सामना रद्द झाला तर? :भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात पावसाचं सावट आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार, या सामन्यात पाऊस होण्याची 70 टक्के शक्यता आहे. यासोबतच सामन्यादरम्यान जोरदार वादळी वाऱ्याचीही अपेक्षा आहे. या सामन्यादरम्यान गयानामध्ये तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. Accuweather.com च्या मते, गयानामध्ये सकाळी 10 वाजता 66%, सकाळी 11 वाजता 75% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच दुपारी 12 वाजता 49%, दुपारी 1 वाजता 34% आणि 2 वाजता 51% पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं सामना रद्द होण्याची शक्यता आहे. पावसामुळं सामना रद्द झाला तर सुपर-8 टप्प्यात अव्वल स्थानी राहिल्यामुळं भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. कारण उपांत्य फेरी-2 साठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.