CAN vs PAK T20 World Cup 2024 : सलग दोन सामने गमावल्यानंतर 2024 च्या टी-20 विश्वचषकातील पाकिस्तान क्रिकेट संघाची स्थिती गंभीर झालीय. आधी अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भारतानं शानदार सामन्यात पाकिस्तानचा पराभव केलाय. आज कॅनडाचा संघ पाकिस्तानी संघाशी भिडणार आहे. हा सामना पाकिस्तानसाठी 'करो या मरो' चा सामना असेल. आजचा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. बाबर आझम पाकिस्तानी संघाचं नेतृत्व करणार आहे. तर साद बिन जफर कॅनडा संघाची कमान संभाळणार आहे.
16 वर्षांनंतर कॅनडा-पाकिस्तान आमनेसामने :पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यातील आजच्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या दोन संघांचा इतिहास काय त्यावर नजर टाकू. पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात आतापर्यंत फक्त 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यात आला. हा सामना ऑक्टोबर 2008 मध्ये कॅनडातील ओंटारियो येथे खेळण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानी संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 137 धावा केल्या होत्या. कॅनडाचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 109 धावा करू शकला. कॅनडा संघानं 35 धावांनी सामना गमावला. आता जवळपास 16 वर्षांनंतर पाकिस्तान आणि कॅनडा आज पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.
खेळपट्टी अहवाल :आज पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यातील टी-20 विश्वचषक 2024 सामना न्यूयॉर्कमधील त्याच नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारतानं एक दिवस आधी पाकिस्तानला पराभूत केलंय. या मैदानाच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं नाही. या खेळपट्टीवर गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. विशेषत: वेगवान गोलंदाज येथे कहर करताना दिसत आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यात या खेळपट्टीवर दोन्ही डावात 17 विकेट पडल्या होत्या. त्यात वेगवान गोलंदाजांनी 15 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळं एकंदरीत आजच्या सामन्यात पाकिस्तान आणि कॅनडाच्या वेगवान गोलंदाजांना आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. त्यावरूनच या सामन्याची स्थिती आणि दिशा ठरणार आहे.
'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा : कॅनडा आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या या सामन्यात सर्वांच्या नजरा पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद आमीर यांच्यावर असतील. कॅनडाच्या बाजूनं त्यांचा कर्णधार साद बिन जफर व्यतिरिक्त नवनीत धालीवाल, निकोलस किर्टन, जेरेमी गॉर्डन आणि डिलन हेलिगर यांच्याकडून अपेक्षा असतील.