हैदराबाद T20 World Cup 2024 :आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना रविवारी न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केलाय. या सामन्यात एकेकाळी पाकिस्तान विजयाच्या जवळ होता. पण जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आणि अखेरीस भारतानं सामना 6 धावांनी जिंकला. अतिशय रोमांचक आणि मनोरंजक असलेल्या या सामन्याचा चाहत्यांनी शेवटपर्यंत खूप आनंद लुटला. विजयानंतर भारतीय क्रिकेट प्रेमींकडून जल्लोष करण्यात आला, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पुण्यात बुलडोझरवर चढून क्रिकेट प्रेमींचा जल्लोष :पाकिस्तानवर भारताच्या थरारक विजयानंतर पुण्यातही जल्लोष साजरा करण्यात आला. पुण्यात चाहते घराबाहेर पडून बुलडोझरवर चढून आनंदोत्सव साजरा करताना दिसले. बुलडोझरवर भारतीय संघाचा झेंडा घेऊन चाहते घोषणा देत होते.
इंदूरमध्ये ढोल-ताशांसह जल्लोष : भारताच्या या विजयानंतर न्यूयॉर्कपासून भारताच्या अनेक भागांमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. मध्य प्रदेशातील इंदूर शहरात रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सामन्यानंतर चाहत्यांनी घराबाहेर पडून फटाक्यांची आतषबाजी केली. इतकंच नाही तर चाहते ढोल ताशाच्या ठेक्यावर नाचताना दिसले. यासोबतच अनेक चाहते तिरंगा फडकवताना दिसले.
न्यूयॉर्क स्टेडियमबाहेरही जल्लोष :भारतीय संघाच्या विजयानंतर न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमबाहेर जल्लोष करण्यात आला. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय चाहते ढोलताशाच्या तालावर नाचताना दिसले.