T20 World Cup 2024 Final IND vs SA :आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट 2024 स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून (शनिवार) रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बार्बाडोस इथं खेळवला जाईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 11 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. भारताला 11 वर्षांपासून कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात यश आलं नाहीय. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारताची कमान सांभाळणार आहे तर ॲडम मार्कराम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करताना दिसणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ या स्पर्धेत अपराजित आहेत. त्यामुळं अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतानं ग्रुप स्टेजमध्ये 3 विजय, सुपर-8 टप्प्यात 3 विजय आणि उपांत्य फेरीत इंग्लंडवर विजय मिळवून आपली अपराजित मोहीम कायम ठेवली. यासोबतच दक्षिण आफ्रिकेनंही ग्रुप स्टेजमध्ये 4 विजय, सुपर-8 टप्प्यात 3 आणि सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानला पराभूत करुन आपली अपराजित मोहीम सुरू ठेवली आहे. फानलमध्ये जो संघ बाजी मारणार त्या संघाच्या नावावर एकही सामना न गमावता टी-20 विश्वचषक जिंकल्याचा रेकॅार्ड होणार आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड :भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत भारतानं 14 सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेनं 11 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णित राहिला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले गेले आहेत. या 6 टी-20 सामन्यांपैकी भारतानं 4 सामने जिंकले आहेत, तर आफ्रिकेनं फक्त 2 सामने जिंकले आहेत. हेड टू हेड रेकॉर्ड मध्ये भारताचा वरचष्मा राहीलाय.
आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्माच्या सर्वाधिक धावा :भारतासाठी रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितनं या संघाविरुद्ध 16 डावात 420 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत रोहितनंतर सूर्यकुमार यादवचा क्रमांक लागतो, ज्यानं आतापर्यंत आफ्रिकेविरुद्ध केवळ 6 सामन्यात 68.6 च्या उत्कृष्ट सरासरीनं 343 धावा केल्या आहेत.