मुंबई Sanjay Bansode News : महाराष्ट्रातील अनेक क्रीडापटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. मात्र या क्रीडापटूंना अधिकारी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि खेळासाठी पोषक वातावरण तयार करून देणं यात अजूनही राज्याच्या वतीनं फारसे प्रयत्न होताना दिसत नाही, अशी चर्चा सुरू आहे. कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे यानं पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजीत कास्यपदक पटकावून भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहे. स्वप्निलच्या या यशानंतर आता महाराष्ट्रातील अन्य खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करण्याचं वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीनं विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी दिली.
'मिशन लक्षवेध' अधिक प्रभावीपणे राबवणार : "राज्य सरकारनं राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी'मिशन लक्षवेध' ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार बारा खेळ निश्चित केले गेले आहे. यामध्ये बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, आर्चरी, शूटिंग, कुस्ती, हॉकी, बॅडमिंटन, सेलिंग, रोइंग, टेबल टेनिस आणि लॉन टेनिस या खेळांचा समावेश आहे. या खेळांच्या दर्जा उंचावण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी 'हाय परफॉर्मन्स सेंटर' उभे करण्यात येणार आहेत तर विभागीय स्तरावर 36 ठिकाणी स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि प्रत्येक जिल्ह्यात 138 क्रीडा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करून दहा टक्के निधी क्रीडा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आहेत," असे क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी सांगितलं. "राज्य सरकारनं यासाठी 160 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या माध्यमातून जिल्हास्तरावर एकूण 2,707, विभागीय स्तरावर 740 आणि राज्यस्तरावर 240 अशा एकूण 3,740 खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी प्रयत्न केले जात आहे, अशी माहिती मंत्री बनसोडे यांनी दिली.