गकबेर्हा SA vs SL 2nd Test Day 5 Live Streaming : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पाचवा दिवस आज म्हणजेच 9 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना गकबेर्हा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेनं 52 षटकांत 5 गडी गमावून 252 धावा केल्या होत्या. आता पाहुण्या संघाला विजयासाठी 143 धावांची गरज आहे. तर यजमान संघाला 5 विकेटची आवश्यकता आहे. यामुळं हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा :सध्या श्रीलंकेसाठी कुसल मेंडिस 56 चेंडूत नाबाद 39 धावा आणि धनंजय डी सिल्वा 64 चेंडूत 39 धावा करत नाबाद आहे. याशिवाय पथुम निसांका 18 धावा, दिनेश चंडिमल 29 धावा, अँजेलो मॅथ्यूज 32 धावा आणि कमिंडू मेंडिस 35 धावा करुन बाद झाले. दुसरीकडे केशव महाराज आणि डॅन पॅटरसन यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंत दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी केली आहे. दोन्ही गोलंदाजांनी 1-1 विकेट घेतली. तर कागिसो रबाडाला एक विकेट मिळाली. दोन्ही संघांसाठी पाचवा दिवस महत्त्वाचा आहे. श्रीलंकेला विजयासाठी 143 धावांची गरज आहे तर दक्षिण आफ्रिकेला पाच विकेट्स घेण्याची गरज आहे.
आफ्रिकेनं दिलं 348 धावांचं लक्ष्य :दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 317 धावा करत श्रीलंकेला विजयासाठी 348 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य दिलं. टेंबा बावुमा (66 धावा, 116 चेंडू) आणि ट्रिस्टन स्टब्स (47 धावा, 112 चेंडू) यांनी महत्त्वपूर्ण खेळी खेळली, तर डेव्हिड बेडिंगहॅम (35) आणि एडन मार्कराम (55) यांनीही उपयुक्त योगदान दिलं. श्रीलंकेसाठी प्रभात जयसूर्यानं शानदार गोलंदाजी करत 34 षटकांत 129 धावा देत 5 बळी घेतले. त्याचवेळी विश्व फर्नांडोनं 2 आणि असिथा फर्नांडो आणि लाहिरु कुमारानं प्रत्येकी 1 विकेट घेतली.
श्रीलंकेच्या पराभवाचा भारताला फायदा : जर श्रीलंकेनं हा सामना जिंकला तर ते 54.54 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर येईल. सध्या त्यांचे 50 टक्के गुण आहेत आणि ते चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळं हा सामना श्रीलंकेनं हरल्यास सध्या तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ (57.29 टक्के गुण) दुसऱ्या स्थानावर येईल. ऑस्ट्रेलिया 60.71 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर राहील.
दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका आतापर्यंत कसोटीत 32 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी आफ्रिकन संघानं 17 जिंकले आहेत. तर श्रीलंकेनं 9 सामने जिंकले आहेत. याशिवाय 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. यावरुन दक्षिण आफ्रिकेचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येतं. तर दक्षिण आफ्रिकेत दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 18 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात दक्षिण आफ्रिकेनं 18 पैकी 14 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेचा संघ केवळ तीन वेळा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला आहे.