चट्टोग्राम South Africa Biggest Test Victory : बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना चट्टोग्राम येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं अवघ्या 3 दिवसांत हा सामना जिंकून मालिकाही जिंकली. यासह दक्षिण आफ्रिकेनं आशियातील मालिका जिंकण्याची प्रदीर्घ प्रतीक्षाही संपवली. त्यांनी 10 वर्षांनंतर आशियामध्ये कसोटी मालिका जिंकली. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयाचा हिरो ठरला कागिसो रबाडा. कागिसो रबाडानं पहिल्या सामन्यातही अप्रतिम गोलंदाजी केली होती.
आफ्रिकेचा सर्वात मोठा विजय : दक्षिण आफ्रिकेनं हा सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यात बांगलादेशचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले, त्यामुळं दक्षिण आफ्रिकेनं हा सामना एक डाव आणि 273 धावांनी जिंकला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा हा सर्वात मोठा विजय आहे. बांगलादेशचा संघ दोन डाव एकत्र करुनही दक्षिण आफ्रिकेच्या एका डावात बरोबरी करु शकला नाही आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. याआधी दक्षिण आफ्रिकेनंही मालिकेतील पहिल्या सामन्यात 7 विकेट्सनं विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत बांगलादेशला त्यांच्याच घरच्या मैदानावर क्लीन स्वीप देण्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ यशस्वी ठरला.