कराची SA Beat AFG 3rd Match : न्यूझीलंड आणि भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघानंही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयानं सुरुवात केली आहे. कराची इथं खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा सहज पराभव केला आणि 107 धावांनी मोठा विजय मिळवला. रायन रिकेल्टनच्या संस्मरणीय पहिल्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 315 धावांचा मोठा आकडा उभारला आणि त्यानंतर कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांच्यासह वेगवान गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 208 धावांत गुंडाळलं.
आफ्रिकेचा सहज विजय : 21 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेतील गट ब चा हा पहिला सामना होता. तसंच, पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या अफगाणिस्तानचाही या स्पर्धेच्या इतिहासात पदार्पण सामना झाला. दोन्ही संघांच्या अलीकडील इतिहासाचा विचार करता, हा सामना खूप रोमांचक आणि कठीण होण्याची अपेक्षा होती. काही महिन्यांपूर्वीच शारहाज इथं अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला वनडे मालिकेत हरवलं होतं. तसंच त्याआधी, T20 विश्वचषकातही दोघांमध्ये खूप चुरशीचा सामना झाला होता, जो दक्षिण आफ्रिकेनं जिंकला होता. पण यावेळी दोघांमधील संघर्ष एकतर्फी असल्याचं सिद्ध झालं. या सामन्यात विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेनं शारजाह इथं झालेल्या मालिका पराभवाचा बदला घेतला आहे.
रिकेलटनचं शानदार शतक :अफगाणिस्ताननं चांगली सुरुवात केली आणि दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टोनी डी झोर्झीला लवकर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. परंतु दुसरा सलामीवीर रियान रिकेलटननं कर्णधार बावुमा (58) सोबत डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 127 धावांची भागीदारी केली, ज्यात प्रथम रिकेल्टन आणि नंतर बावुमा यांनी आपापलं अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर रिकेलटननं त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतकही पूर्ण केलं. तो 103 धावा करुन बाद झाला. पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्यांचे आक्रमण सुरुच ठेवले. रॅसी व्हॅन डर ड्यूसेन (52) यानं जलद अर्धशतक झळकावलं तर एडेन मार्करामनंही अवघ्या 36 चेंडूत नाबाद 52 धावा करत संघाला सन्मानजनक 315 धावांपर्यंत पोहोचवलं.