नवी मुंबई Smriti Mandhana World Record : भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक सलामीवीर स्मृती मंधानासाठी 2024 हे वर्ष T20 इंटरनॅशनलमध्ये आतापर्यंतचं सर्वोत्कृष्ट वर्ष ठरलं आहे, ज्यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये तिनं अर्धशतकं झळकावली होती.
भारताचा 60 धावांनी विजय : गुरुवार 19 डिसेंबर रोजी खेळल्या गेलेल्या या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या निर्णायक सामन्यात, मंधानानं 47 चेंडूत 77 धावांची शानदार खेळी केली आणि 20 षटकांत संघाची धावसंख्या 217 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या धावसंख्येच्या तुलनेत वेस्ट इंडिजचा महिला संघ 20 षटकांत केवळ 157 धावांपर्यंत मजल मारु शकला आणि त्यांना सामन्यात 60 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. मंधानानं महिला T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 77 धावांच्या खेळीसह एक नवीन विक्रमही रचला आहे ज्यात तिनं श्रीलंकेची खेळाडू चमारी अटापट्टूचा विक्रम मोडला आहे.
मंधानानं ठोकले 7 चेंडूत 7 चौकार : स्मृती मंधनानं तिसऱ्या आणि चौथ्या षटकात ही कामगिरी केली. तिसरं षटक टाकताना हेन्रीच्या चौथ्या चेंडूवर मंधानानं चौकार मारला. मंधानानं पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मंधानाला स्ट्राइक मिळाला आणि या खेळाडूनं डॉटिनच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि पाचव्या चेंडूवर चौकार लगावला. अशाप्रकारे मंधानानं सलग 7 चौकार लगावले.
मंधानाची खास हॅट्ट्रिक : स्मृती मंधानानं केवळ सलग 7 चौकारच ठोकले नाहीत, याशिवाय तिनं केवळ 27 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मोठी गोष्ट म्हणजे या मालिकेतील मंधानाचं हे तिसरं अर्धशतक आहे. अशा प्रकारे तिनं अर्धशतकांची हॅट्ट्रिक केली. मंधानानं पहिल्या T20 सामन्यात 54 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात या खेळाडूनं 62 धावांची खेळी केली होती.