मुलतान 2 Bowlers Picked 20 Wickets : स्टार फलंदाज बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांच्याशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघानं मुलतान क्रिकेट मैदानावर इंग्लंडचा 152 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे सलग 11 पराभवानंतर घरच्या मैदानावर पहिला कसोटी विजय मिळवला. याच मैदानावर इंग्लंडनं पाकिस्तानचा पराभव केला होता, तर आता पाकिस्ताननं पलटवार केला आहे. त्यामुळं कसोटी मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचे हिरो ठरले नोमान अली आणि साजिद खान. या दोघांनी मिळून सर्व 20 विकेट घेतल्या. दोनच गोलंदाजांनी एका कसोटीत पुर्ण 20 विकेट घेतल्या असं 52 वर्षांनी प्रथमच घडलं आहे.
52 वर्षांनी झाली इतिहासाची पुनरावृत्ती : यापुर्वी 1972 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बॉब मॅसी आणि डेनिस लिली यांनी 1972 मध्ये लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्या सामन्यात बॉब मॅसीनं 16 तर डेनिस लिलीनं 4 विकेच घेतल्या होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं आतापर्यंत सहा वेळा झालं आहे. यात सर्वप्रथम 1902 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मोंटी नोबल (13) आणि ह्यूग ट्रंबल (7) यांनी इंग्लंडविरुद्ध एका कसोटी सामन्यात 20 विकेट घेण्याचा कारनामा केला होता.
सामन्याचं संक्षिप्त धावफलक :
- पाकिस्तान : पहिला डाव 366 धावा, दुसरा डाव 221 धावा
- लक्ष्य : 297 धावा
- इंग्लंड : पहिला डाव 291 धावा, दुसरा डाव 144 धावा
कसोटी सामन्यात दोन गोलंदाजांनी घेतलेल्या सर्व 20 विकेट :
- माँटी नोबल (13) आणि ह्यू ट्रंबूल (7) विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न, 1902
- कॉलिन ब्लिथ (11) आणि जॉर्ज हर्स्ट (9) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बर्मिंगहॅम, 1909
- बर्ट वोगलर (12) आणि ऑब्रे फॉकनर (8) विरुद्ध इंग्लंड, जोहान्सबर्ग, 1910
- जिम लेकर (19) आणि टोनी लॉक (1) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर, 1956
- फजल महमूद (13) आणि खान मोहम्मद (7) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कराची, 1956
- बॉब मॅसी (16) आणि डेनिस लिली (4) विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, 1972