बेंगळुरु Sarfaraz Khan Maiden Century : आपत्तीत संधी शोधणं कशाला म्हणतात तर हे सर्फराज खानकडून शिकावं. न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरु इथं सुरु असेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघावर डावाच्या पराभवाची भीती असताना सर्फराज खाननं कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळून सर्वांची मनं जिंकली. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी सर्फराज खाननं आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. तिसऱ्या दिवशीच्या 70 धावांच्या पुढं खेळताना सर्फराजनं चौकारासह शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे याच सामन्याच्या पहिल्या डावात सर्फराज खान शून्यावर आउट झाला होता, आणि आता भारताच्या दुसऱ्या डावात त्यानं शतक ठोकलं, पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात शतक करणारा सर्फराड खान भारताचा 22वा खेळाडू ठरलाय.
यावर्षी झालं कसोटी पदार्पण : देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्यानंतर सर्फराज बराच वेळ संधी येण्याची वाट पाहत राहिला. पण त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकलं नाही. यामुळं नाउमेद होण्याऐवजी तो स्वतःवर काम करत राहिला. शतकामागून शतकं झळकावत राहिला. अखेर 15 फेब्रुवारीला राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. 62 धावा केल्यानंतर तो शतकाकडं वेगानं वाटचाल करत होता, मात्र रवींद्र जडेजाच्या चुकीमुळं तो धावबाद झाला.