मुंबई Wankhede Stadium :मुंबईचे अनेक आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटू 19 जानेवारी रोजी प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम 12 जानेवारी रोजी सुरु होतील आणि 19 जानेवारी रोजी एका भव्य मुख्य कार्यक्रमाने संपणार आहे.
अनेक दिग्गज होणार सहभागी : माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, दिलीप वेंगसरकर आणि डायना एडुलजी यांच्यासह मुंबईचे अनेक माजी भारतीय क्रिकेट खेळाडू वानखेडे स्टेडियमचे ऐतिहासिक महत्त्व साजरे करण्यासाठी एकत्र येतील. तसंच मुख्य कार्यक्रमात मुंबईचे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्टार पुरुष आणि महिला खेळाडू देखील सहभागी होतील. उपस्थितांना प्रसिद्ध कलाकार अवधूत गुप्ते आणि अजय-अतुल यांच्या सादरीकरणाचा आणि एका लेसर शोचा आनंद घेता येईल.
काय म्हणाले एमसीए अध्यक्ष : याबाबत बोलताना एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, "आपण प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमचा 50 वा वर्धापन दिन साजरा करत असताना, मी सर्व क्रिकेट चाहत्यांना या महत्त्वपूर्ण प्रसंगाचा भाग होण्यासाठी मनापासून आमंत्रित करतो. आमचे दिग्गज नायक या उत्सवाचा भाग असतील. आमच्यात सामील व्हा आणि मुंबईचा अभिमान असलेल्या वानखेडे स्टेडियमच्या समृद्ध वारशाला आपण एकत्र येऊन आदरांजली वाहूया. चला हा उत्सव खरोखरच अविस्मरणीय बनवूया."