महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'बॉल बॉय' ते क्रिकेटचा देव: 51 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सचिनचे 'हे' विक्रम मोडणं जवळपास अशक्यच! - Sachin Tendulkar Birthday - SACHIN TENDULKAR BIRTHDAY

Happy Birthday Sachin Tendulkar : कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकं झळकावणारा सचिन तेंडुलकर आज आपल्या आयुष्यातील 51 वर्ष पूर्ण करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कामगिरीवर एक नजर टाकू.

Sachin Tendulkar Birthday
सचिन तेंडुलकर वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 8:02 AM IST

Updated : Apr 24, 2024, 3:16 PM IST

मुंबई Happy Birthday Sachin Tendulkar : आजघडीला भारतात क्रिकेटचे चाहते क्रिकेटला धर्मासारखं जवळचं मानतात. पण हा खेळ भारतात इतका प्रसिद्ध करण्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकरचं महत्त्वाचं योगदान होतं. म्हणूनच त्याला 'क्रिकेटचा देव' म्हटलं जातं.

तीन दशकांहून अधिक काळ क्रिकेटच्या मैदानावर राज्य करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज (24 एप्रिल 2024) 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत जन्मलेल्या सचिन तेंडुलकरनं वर्षानुवर्षे मैदानावर कठोर परिश्रम केले. देशाचं नाव सर्वत्र गाजवून हे यश संपादन केलं.

वयाच्या 16 व्या वर्षी आतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण : सचिन तेंडुलकरला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्यानं भारतीय संघात पदार्पण केलं. सचिननं 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळला होता. मात्र, यात तो मोठी खेळी करू शकला नाही. पहिल्या सामन्यात सचिन केवळ 15 धावा करून बाद झाला.

1987 च्या विश्वचषकात होता बॉल बॉय : 1987 मध्ये भारतीय भूमीवर पहिला विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेच्या वेळी सचिन फक्त 14 वर्षांचा होता. तो बॉल बॉय म्हणून काम करत होता. बॉल बॉय म्हणून त्यानं विश्वचषक सामना चांगला पाहिला होता. तो बरंच काही शिकला होता.

24 वर्षांची प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्द : सचिनला अनेकदा "क्रिकेटचा देव" म्हणून संबोधलं जातं. तो क्रिकेटचा महान फलंदाज मानला जातो. तब्बल 664 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 48.52 च्या सरासरीनं 34,357 धावा करत सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतकं आणि 164 अर्धशतकं केली आहेत. क्रिकेटच्या इतिहासात शंभर शतकं करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

क्रिकेटमध्ये केले अनेक मोठे विक्रम : सचिन तेंडुलकरनं क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यापैकी अनेक विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पहिलं द्विशतक झळकावणारा तो खेळाडू होता. त्यानं या प्रकारामध्ये 49 शतकंही ठोकली आहेत. याशिवाय क्रिकेटच्या या दिग्गजानं अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

'भारतरत्न', राजीव गांधी क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारा एकमेव खेळाडू : क्रिकेटमधील योगदानाबद्दल सचिन तेंडुलकरला 2014 मध्ये 'भारतरत्न', 1998 मध्ये पद्मश्री, 1997 मध्ये राजीव गांधी क्रीडा पुरस्कार, 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. इतके पुरस्कार मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे.

  • सचिनचे हे विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहे :

सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम : सचिन तेंडुलकरनं कसोटी सामने आणि एकदिवसीय सामन्यांसह एकूण 663 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्यानं कसोटीत 51 शतकं आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 शतकं झळकावली आहेत. सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 100 शतकं ठोकली आहेत. या बाबतीत विराट कोहली त्याच्या सर्वात जवळ आहे. पण कोहलीलाही 100 शतकं झळकावणं शक्य नाही. मात्र, विराट कोहलीनं सचिनच्या वनडेतील 49 शतकांचा विक्रम मात्र मोडलाय.

सर्वाधिक कसोटी सामने :सचिन तेंडुलकरनं कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 200 कसोटी सामने खेळले आहेत. तो सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू आहे. या बाबतीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन 187 सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर असला तरी 41 वर्षीय अँडरसनसाठी आणखी 13 कसोटी सामने खेळणं सोपं जाणार नाही.

विश्वचषकात सर्वाधिक धावा :विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 2003 च्या विश्वचषकात सचिननं 673 धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेले नाही. त्या खालोखाल मॅथ्यू हेडननं 659 धावा केल्या आहेत. रोहित शर्मानं एका सत्रात 648 धावा केल्या आहेत. परंतु सचिनचा विक्रम कोणीही मोडू शकलं नाही. भविष्यातही सचिनचा हा विक्रम मोडणं कठीण आहे.

सर्वात प्रदीर्घ एकदिवसीय कारकीर्द : सचिन तेंडुलकर तब्बल 22 वर्षे 91 दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळला. हादेखील एक विक्रमच आहे. सचिनशिवाय इतर कोणत्याही खेळाडूची एवढी प्रदीर्घ कारकीर्द झालेली नाही. क्रिकेटच्या बदलत्या काळात खेळाडूंवरील कामाचा ताण वाढत असून फिटनेस हे मोठं आव्हान आहे. अशा परिस्थितीत सचिनचा हा विक्रमदेखील मोडणं जवळपास अशक्य आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 51 शतकं झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. या बाबतीत त्याच्या खालोखाल दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसचा क्रमांक लागतो. त्यानं 45 शतकं झळकावली आहेत. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये स्टीव्ह स्मिथ 30 शतकांसह आघाडीवर आहे. तर रुटच्या नावावर 29 आणि विल्यमसन आणि कोहलीची 28 शतकं आहेत. तथापि, 51 शतकांपर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी अत्यंत कठीण आहे.

क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा :सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34357 धावा केल्या आहेत. त्याचा हा विक्रम मोडणं जवळपास अशक्य आहे. या बाबतीत सचिननंतर कुमार संगकाराचं नाव येतं. त्यानं 28016 धावा केल्या आहेत. सध्या खेळत असलेल्या फलंदाजांमध्ये विराट कोहली आघाडीवर आहे. त्यानं 25322 धावा केल्या आहेत. मात्र, कोहलीला आगामी काळात 10 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणं अत्यंत कठीण असणार आहे.

कसोटीत सर्वाधिक चौकार :कसोटीतसर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्यानं कसोटीत 2058 हून अधिक चौकार मारले आहेत. यात राहुल द्रविड 1654 चौकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सध्याच्या खेळाडूंमध्ये जो रुट 1204 चौकारांसह आघाडीवर आहे. पण सचिनचा विक्रम मोडणं त्याच्यासाठी खूप कठीण जाईल. सध्याच्या काळात रनमशीन समजला जाणारा विराट कोहली तर याबबतीत सचिनच्या आसपासही नाही. विराटनं 113 कसोटी सामन्यांत 991 चौकार मारले आहेत.

  • एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक सामनावीर : एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक सामनावीर पुरस्कारदेखील मास्टर ब्लास्टरनं जिंकले आहेत. सचिननं आपल्या कारकिर्दीत 62 सामनावीर पुरस्कार पटकावले आहेत.
  • 6 विश्वचषक खेळणारा एकमेव क्रिकेटपटू : 6 विश्वचषक खेळणारा सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्यानं 1992, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 चे विश्वचषक खेळले आहेत.

फलंदाजीसोबत सचिन तेंडुलकरचे गोलंदाजीतही 2 आश्चर्यकारक विक्रम आहेत.

1. कमी धावा यशस्वीपणे बचावणारा एकमेव गोलंदाज : टी-20 क्रिकेटच्या आगमनानंतर, फलंदाज आता शेवटच्या काही षटकांमध्ये 10 पेक्षा जास्त धावांच्या सरासरीनं धावा करण्यास सक्षम आहेत. असे अनेक सामने आपण आतापर्यंत पाहिले आहेत. तुम्हाला हे जाणून आणखी आश्चर्य वाटेल की सचिन तेंडुलकर हा एकमेव असा गोलंदाज आहे, ज्यानं एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या शेवटच्या षटकात दोनदा 6 किंवा त्यापेक्षा कमी धावा यशस्वीपणे वाचवल्या आहेत. सचिन तेंडुलकरनं 1993 मध्ये हिरो कपच्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यानंतर 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला होता.

2. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिननं शेन वॉर्नपेक्षा 5 विकेट जास्त वेळा घेतल्या : दिवंगत शेन वॉर्न हा क्रिकेट विश्वातील एक महान फिरकी गोलंदाज होता. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 700 हून अधिक विकेट्स आहेत. केवळ गोलंदाजीच्या जोरावर त्यानं आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियन संघासाठी अनेक सामने जिंकले. त्यानं गोलंदाजीत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एकदिवसीय गोलंदाजीच्या एका विक्रमाच्या बाबतीत सचिन तेंडुलकरनं शेन वॉर्नला मागं टाकलंय. सचिन तेंडुलकरनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध त्यानं ही कामगिरी केली. तर कसोटी क्रिकेटचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नला एकदिवसीय सामन्यात केवळ एकदाच पाच बळी घेता आले.

हेही वाचा :

  1. 'क्रिकेटच्या देवा'नं पत्नीसाठी तळल्या भजी; स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ केला पोस्ट - Sachin Tendulkar
Last Updated : Apr 24, 2024, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details