नवी दिल्ली SA20 Auction Live Streaming : IPL च्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेत जानेवारी 2023 पासून T20 लीग सुरु झाली. IPL च्याच मालकांनी या लीगचे सर्व संघ विकत घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सनं पर्ल संघ विकत घेतला. यासह एमआय केप टाऊन, जॉबर्ग सुपर किंग्स, डर्बन सुपर जायंट्स, प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स इस्टर्न केप या संघांचा या लीगमध्ये समावेश आहे.
लिलावासाठी 200 खेळाडूंची निवड : ही SA20 लीग क्रिकेट दक्षिण आफ्रिकेद्वारे आयोजित केली जाते. या लीगचे दोन हंगाम झाले आहेत आणि दोन्ही वेळा एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स इस्टर्न केपनं विजेतेपद पटकावलं आहे. आता SA20 लीगचा 2025 च्या हंगामासाठी लिलाव आज मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी केपटाऊन, दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. जिथं सर्व संघांना आपल्या संघात चांगल्या खेळाडूंचा समावेश करायला आवडेल. लिलावासाठी सुमारे 200 खेळाडू निवडले गेले आहेत. त्यापैकी 115 दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आहेत. विशेष म्हणजे सर्व संघ मिळून केवळ 13 खेळाडू खरेदी करु शकतात.
SA20 च्या 2025 हंगामात 6 संघ सहभागी : SA20 च्या 2025 लीगमध्ये 6 संघ खेळताना दिसतील. यात डर्बन सुपर जायंट्स, जॉबर्ग सुपर किंग्स, एमआय केप टाऊन, प्रिटोरिया कॅपिटल्स, सनरायझर्स इस्टर्न केप, पर्ल रॉयल्स यांचा समावेश आहे. पुढील वर्षी 9 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग आणि UAE मध्ये ILT20 लीग होणार आहे. शमर जोसेफ, नसीम शाह, जोश लिटल, न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल, कामेंदू मेंडिस, अफगाणचा फिरकी गोलंदाज कैस अहमद या दिग्गज खेळाडूंना लिलावासाठी निवडण्यात आलं आहे. जॉबर्ग सुपर किंग्स ने रिझा हेंड्रीक्सला रिलीज केलं. तो त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. लिलावात सर्व संघांच्या नजरा त्याच्यावर असतील.