मुंबई Ranji Trophy Match :रोहित शर्मा लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये सतत संघर्ष करत आहे. गेल्या 15 कसोटी डावांमध्ये त्यानं 10.93 च्या सरासरीनं फक्त 164 धावा केल्या होत्या. बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. यानंतर, तो आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी स्थानिक क्रिकेटकडे वळला. भारतीय कर्णधारानं आज 23 जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरविरुद्ध जवळजवळ 10 वर्षांनी रणजी सामना खेळला. पण त्याचा संघर्ष इथंही सुरुच राहिला. तो फक्त 3 धावा करुन बाद झाला. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियात फलंदाजीचं कौशल्य दाखवणारा यशस्वी जैस्वालही या सामन्यात कामगिरी करु शकला नाही.
3365 दिवसांनंतर रणजीत सहभाग : आज 23 जानेवारीपासून, अनेक संघांमधील सामने वेगवेगळ्या ठिकाणी खेळले जात आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये एक नाव भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचंही आहे. तो तब्बल 3365 दिवसांनी रणजी ट्रॉफी सामना खेळत आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचं नाव समाविष्ट आहे. रोहितनं या स्पर्धेत शेवटचा सहभाग सुमारे 10 वर्षांपूर्वी 7 नोव्हेंबर 2015 रोजी उत्तर प्रदेशविरुद्ध घेतला होता.
जम्मू आणि काश्मीरविरुद्ध रोहित फ्लॉप :मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, भारताची सलामी जोडी म्हणजेच यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा मुंबईकडून डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले. पण जम्मू आणि काश्मीरच्या गोलंदाजांनी त्यांना खूप त्रास दिला. विशेषतः 6 फूट 4 इंच उंचीच्या उमर नझीरसमोर ते पूर्णपणे असहाय्य दिसत होते. रोहितला त्याचा चेंडू वाचण्यात अडचण येत होती. परिणाम असा झाला की 12 डॉट बॉल टाकल्यानंतर, उमरनं त्याला 13 व्या चेंडूवर बाद केलं.