मुंबई Rohit Sharma :रोहित शर्मा बराच काळापासून टी-20 क्रिकेट खेळत आहे. या प्रदीर्घ प्रवासात त्यानं अनेक ऐतिहासिक विक्रम केले आहेत. आता रोहित टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 500 षटकार मारणारा पहिला आशियाई फलंदाज ठरलाय. रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला गेला. यात रोहित शर्मानं 5 षटकार मारुन आपल्या टी-20 कारकिर्दीत 500 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. 'हिटमॅन' रोहित शर्माचा सिक्सर किंग होण्याची सुरुवात 2006 साली झाली. आता 18 वर्षांनंतर तो केवळ भारतातच नव्हे तर आशिया खंडात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनलाय.
2006 मध्ये मारला होता पहिला षटकार : रोहित शर्मानं 2006 च्या आंतरराज्य टी-20 स्पर्धेत त्याच्या टी-20 कारकिर्दीतील पहिला षटकार मारला. मुंबईकडून खेळताना त्यानं बडोद्याविरुद्धच्या सामन्यात पहिला षटकार मारला. त्याच्या टी-20 कारकिर्दीतील 500 वा षटकार आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात आला. रोहितनं आतापर्यंत आपल्या टी-20 कारकिर्तीत 432 सामने खेळले आहेत. यात त्यानं 8 शतकं आणि 74 अर्धशतकं झळकावत 11417 धावा केल्या आहेत. रोहितनं त्याचा पहिला षटकार. त्याचा 500 वा षटकार मारला तेव्हा अजिंक्य रहाणे दोन्ही सामन्यात खेळत होते, एक रोचक तथ्य आहे.
पहिला भारतीय फलंदाज : रोहित शर्मानंतर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज विराट कोहली आहे. त्यानं आतापर्यंत 383 षटकार ठोकले आहेत. तर रोहितनंतर सर्वाधिक षटकार ठोकणारा आशियाई फलंदाज शोएब मलिक आहे. ज्याच्या नावावर सध्या 420 षटकार आहेत.