मुंबई BCCI next Secretary : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पुढील सचिवाबाबत एक आश्चर्यकारक नाव समोर आलं आहे. वृत्तानुसार, जय शाह यांनी पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यास, रोहन जेटली बीसीसीआयचे पुढील सचिव म्हणून त्यांची जागा घेऊ शकतात.
रोहन जेटली होणार बीसीसीआयचे नवे सचिव : दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, दिवंगत राजकारणी तथा भाजपा नेते, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे पुत्र असलेले दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) विद्यमान अध्यक्ष रोहन जेटली यांच्या नावावर एकमत झालं आहे. तथापि, बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासह इतर सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांच्या भूमिकेत राहतील कारण त्यांच्या संबंधित कार्यकाळात आणखी एक वर्ष शिल्लक आहे.
जय शहा भरणार अर्ज? : शाह यांना आयसीसीचे पुढील अध्यक्षपद स्वीकारण्यात रस आहे की नाही, याबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे. कारण त्यांनी अद्याप उमेदवारी अर्ज भरलेला नाही आणि त्यासाठी 27 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. आयसीसीचे निवर्तमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी अलीकडेच पुष्टी केली होती की ते तिसऱ्या टर्मसाठी आपला दावा सादर करणार नाहीत.
शाह आयसीसीचे होऊ शकतात सर्वात तरुण अध्यक्ष : शरद पवार, जगमोहन दालमिया, शशांक मनोहर आणि एन श्रीनिवासन हे असे भारतीय आहेत, ज्यांनी यापूर्वी आयसीसीचं नेतृत्व केलं आहे. आता 35 वर्षीय जय शाह आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनू शकतात. आयसीसीच्या नियमांनुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 16 मतं पडतात. विजेत्यासाठी 9 मतं आवश्यक आहेत. शाह यांना आयसीसी बोर्डाच्या 16 पैकी 15 सदस्यांचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत आयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक ही केवळ औपचारिकता आहे.
हेही वाचा :
- जय शाहांनंतर कोण होणार सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचा सचिव? राज्यातील बड्या भाजपा नेत्यासह 'ही' चार नावं चर्चेत - BCCI Secretary
- आयसीसीला 5 वेळा बदलावं विश्वचषकाचं ठिकाण; पाकिस्तानकडूनही हिसकावलं होतं यजमानपद - ICC World Cup