नवी दिल्ली Ravindra Jadeja Retirement : भारतीय क्रिकेट संघानं टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर चाहत्यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर आता 'सर' म्हणजेच रवींद्र जडेजानंही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. खुद्द रवींद्र जडेजानं सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली.
15 वर्षांच्या टी20 कारकिर्दीला निरोप : सर रवींद्र जडेजानं 10 फेब्रुवारी 2009 रोजी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये खेळला. पदार्पणाच्या टी20 सामन्यात जडेजानं 4 षटकात 29 धावा देऊन एकही विकेट घेतली नाही. तर फलंदाजीत त्यानं 7 चेंडूत 5 धावा केल्या होत्या.
पदार्पण आणि शेवटचा सामना सारखाच : जडेजानं टी20 विश्वचषक 2024 च्या फायनलचा शेवटचा सामना खेळला होता. या सामन्यात जडेजानं फलंदाजीत 2 धावा केल्या. तर गोलंदाजीतही त्याला 12 धावा देऊन एकही बळी घेता आला नाही. म्हणजे त्याचा पदार्पण आणि शेवटचा सामना जवळपास सारखाच राहिला आहे.
विश्वचषकात चालली नाही जादू : सहा टी20 विश्वचषक खेळण्याचा अनुभव असूनही जडेजा यावेळी टी20 विश्वचषकात कोणतीही विशेष खेळी करु शकला नाही. या टी20 विश्वचषकात त्यानं 8 सामन्यांच्या 5 डावात फलंदाजी केली. यात 11.66 च्या सरासरीनं आणि 159.09 च्या स्ट्राईक रेटनं त्यानं 35 धावा केल्या. जडेजाची सर्वात मोठी खेळी म्हणजे नाबाद 17 धावांची होती. तसंच या विश्वचषकात जडेजाला गोलंदाजीतही कमाल दाखवता आली नाही. त्यानं एकूण 14 षटकं टाकली, ज्यात त्यानं फक्त 1 बळी घेतला. एकूणच जडेजानं 6 टी 20 विश्वचषकांमध्ये 30 सामने खेळले, ज्यात त्यानं फलंदाजीत 130 धावा केल्या. तर एकूण 22 विकेट्सही घेतल्या आहेत.
कशी आहे कारकिर्द : या अष्टपैलू खेळाडूनं 74 टी20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. ज्यात एक फलंदाज म्हणून त्यानं 21.46 च्या सरासरीनं आणि 127.16 च्या स्ट्राईक रेटनं 515 धावा केल्या. त्याचवेळी रवींद्र जडेजानं भारतासाठी गोलंदाज म्हणून 74 टी 20 सामन्यांमध्ये 7.62 इकॉनॉमी आणि 29.85 च्या सरासरीनं 54 बळी घेतले आहेत.
हेही वाचा :
- 'हिटमॅन' रोहित शर्मा...! भारतीय संघाला विश्वविजेता बनवताच कर्णधार रोहितनं केले अनेक विक्रम - Rohit Sharma Records
- टीम इंडियाला दुहेरी झटका; विराटनंतर 'हिटमॅन'ची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा - Rohit Sharma Retirement