बेंगळुरु Rahul Dravid Car Accident : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक 'द वॉल' राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात तो बेंगळुरुमध्ये एका पिकअप ऑटो चालकाशी वाद घालताना दिसत आहे. द्रविड त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो आणि क्रिकेटच्या मैदानावर तो क्वचितच रागावलेला दिसतो. मात्र, आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सर्व चाहत्यांसाठी तो निश्चितच थोडा धक्कादायक आहे. राहुल द्रविड त्याच्या गाडीतील डेंट तपासत असताना, त्याचा पिकअप ड्रायव्हरशी वाद झाला जो व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत : 4 फेब्रुवारी रोजी, राहुल द्रविड बेंगळुरुमधील कनिंघम रोडवर त्याच्या कारमधून प्रवास करत होता, तेव्हा अचानक त्याच्या कारच्या पुढं जाणाऱ्या एका पिक-अप वाहनानं ब्रेक लावला, ज्यामुळं द्रविडची कार त्या वाहनाला धडकली. या घटनेमुळं कोणतंही मोठं नुकसान झालं नसलं तरी, सामान्य माणसाप्रमाणे द्रविडनं प्रथम त्याच्या गाडीवरील डेंट तपासला आणि नंतर त्यावरुन पिकअप ड्रायव्हरशी वाद घातला. ही घटना संध्याकाळी 6:30 च्या सुमारास घडली आणि तिथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं त्याचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये, ड्रायव्हर द्रविडला सांगत आहे की त्याच्या समोरील एका कारनं अचानक ब्रेक लावला, ज्यामुळं त्यालाही ब्रेक लावावा लागला. ड्रायव्हरला उत्तर देताना द्रविड म्हणाला की मला सगळं माहिती आहे, मी गाडी पुढं किती दूर होती ते पाहिलं आणि तरीही तू अचानक ब्रेक लावलास. या घटनेबाबत राहुल द्रविडनं कोणतीही पोलीस तक्रार दाखल केलेली नाही. द्रविड हा बेंगळुरु वाहतूक पोलिसांचा रस्ता सुरक्षा राजदूत देखील राहिला आहे.