मुंबई : भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटुंनी सॉली ॲडमचे आभार मानले पाहिजे. सॉलीनं निस्वार्थी भावनेनं त्यांच्यावर नेहमी प्रेम केलं. अनेक क्रिकेटपटुंच्या जडणघडणीत त्यांचं सहकार्य मिळालं, असं मत दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते आज 'सॉली ॲडम: बियॉन्ड बाऊंडरीज' चं प्रकाशन मुंबईत सीसीआय क्लबमध्ये दिमाखदार सोहळ्यात पार पडलं. त्यावेळी सुनील गावस्कर बोलत होते.
उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी नेहमी मदत : "सॉली ॲडमबरोबरची माझी पहिली भेट अजून स्मरणात आहे. सॉलीसोबत माझ्या अनेक सुखद आठवणी आहेत. सॉली आणि माझी 50 वर्षांपेक्षा जास्त मैत्री आहे. सॉलीच्या जीवनाची माहिती देणारे पुस्तक प्रकाशित होत असल्यानं मला खूप आनंद झाला आहे. क्रिकेट या खेळाला सॉली सारखे लोक मिळणं खूप भाग्यवान आहे. त्यांनी लीगमध्ये खेळण्यासाठी आलेल्या भारतीय आणि पाकिस्तानी उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी नेहमीच मदत केली आहे. या पुस्तकाद्वारे लोक सॉलीला पूर्णपणे निःस्वार्थ व्यक्ती, खरे क्रिकेटप्रेमी म्हणून ओळखतील," असं सुनील गावस्कर म्हणाले.
क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी देखील सॉली सोबतच्या आठवणी सांगितल्या. शेकडो उदयोन्मुख क्रिकेटपटुंना सॉलीनं संधी दिली. त्यानं फार चांगलं काम केलं. त्याच्या कार्याचा मला आदर आहे. सॉलीनं क्रिकेटपटूंना नेहमीच मनापासून मदत केल्याचं दिलीप वेंगसरकर म्हणाले.
सुनील गावस्करांसोबत अनेक आठवणी : सॉली ॲडम यांनी आपल्या मनोगतात अनेक आठवणींना उजाळा दिला. जे क्रिकेटपटू माझ्याकडे आले, त्यांना जमेल तशी मदत केली. सुनील गावस्करांसोबत माझ्या अनेक आठवणी आहेत, त्यावरही स्वतंत्र पुस्तक लिहिता येऊ शकतं. माझे आई-वडील माझी प्रेरणा आहेत. 'खा के खुश मत होना, खिलाके खुश होना', या आईनं दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपण नेहमी वाटचाल केल्याचं ते म्हणाले.