कॅनबेरा PM Doing Commentary in Match : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय संघ तिथं 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत सहभागी होणार आहे. पर्थमध्ये खेळला गेलेला पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यानंतर मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणार आहे. त्याआधी भारतीय संघाचा कॅनबेरा इथं पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध सराव सामना होत आहे. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय सराव सामन्यासह भारतीय संघ पिंक बॉल टेस्टची तयारी करेल.
पंतप्रधान पोहोचले कॉमेंट्री बॉक्समध्ये : कॅनबेरा येथील सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसानं व्यत्यय आणला. त्यामुळं नाणेफेक वेळेवर होऊ शकली नाही. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ड्रेसिंग रुममध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळालं. पीएम अल्बानीज थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचले आणि कॉमेंट्री टीमसोबत काही वेळ घालवला. ते क्रिकेट कॉमेंट्री करतानाही दिसले. इतकंच नव्हे तर सामन्याच्या समालोचकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरंही दिली.
हेझलवूडच्या जागी कोण खेळणार? : यादरम्यान, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जोश हेझलवूडच्या जागी वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडचा संघात समावेश करण्याबाबत पंतप्रधान बोलले. शनिवारी, हेझलवूड साइड स्ट्रेनच्या दुखापतीमुळं ॲडलेड ओव्हल सामन्यासाठी संघाबाहेर होता. त्यामुळं गोलंदाजीत एक जागा रिक्त झाली आहे. बोलंड आधीच संघात आहे. पर्थ इथं झालेल्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नाही. बोलंडची उपस्थिती असूनही ऑस्ट्रेलियानं दोन वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश केला आहे. शॉन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट यांना स्थान देण्यात आले आहे.