पॅरिस Paris Olympics 2024 Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्टार भारतीय बॅडमिंटन जोडीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहज विजय मिळवत आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. या भारतीय जोडीनं बॅडमिंटन पुरुष दुहेरी स्पर्धेतील गट सामन्यात फ्रान्सच्या लुकास कोर्वी आणि रोनन लाबर यांचा 21-17, 21-14 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. 46 मिनिटं चाललेल्या या सामन्यात भारताला फ्रान्सकडून खडतर आव्हान मिळालं. परंतु, आशियाई क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन सात्विक-चिरागनं यजमानांची निराशा केली आणि आपल्या ऑलिम्पिक मोहिमेला विजयानं सुरुवात केली.
पहिल्या सेटपासून दाखवला वेगवान खेळ : कोर्वी आणि लाबर यांना घरच्या प्रेक्षकांनी साथ दिली पण त्यांना तिसऱ्या मानांकित भारतीय जोडीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. आशियाई क्रीडा चॅम्पियन्सनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच वेगवान खेळ दाखवला आणि अनेक दमदार स्मॅशसह गुण मिळवले. भारतासाठी ऑलिम्पिक पदकासाठी प्रबळ दावेदार असलेल्या या जोडीनं पहिला सेट 21-17 असा जिंकला आणि गेममध्ये 1-0 अशी आघाडी घेतली.
दुसरा सेट झाला एकतर्फी : दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही देशांमध्ये एकतर्फी लढत पाहायला मिळाली. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला फ्रेंच खेळाडूंनी भारतीय शटलर्संना थोडं आव्हान दिलं पण सात्विक-चिरागच्या आक्रमक खेळासमोर ते टिकू शकले नाहीत. भारतीय जोडीनं दुसरा सेट 21-14 असा सहज जिंकून पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिला विजय नोंदवला.