पॅरिस Paris Olympics 2024 Badminton : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक-चिराग यांचा सामना जर्मन जोडीशी होणार होता. पण, मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल यांच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळं हा सामना रद्द करण्यात आला आहे. सात्विक-चिरागच्या रद्द झालेल्या दुसऱ्या सामन्यचा निकाल आता ग्राह्य धरला जाणार नाही. तोच दुसरीकडे भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला मोठा धक्का बसला आहे. पहिला सामना जिंकल्यानंतरही त्याला तो सामना पुन्हा खेळावा लागणार आहे, कारण ग्वाटेमालाचा खेळाडू केविन गोर्टनविरुद्धचा त्याचा विजय रद्द ठरला आहे.
का झाला सामना रद्द : जागतिक बॅडमिंटन संघटनेनं सोमवारी सकाळी लॅम्सफसच्या दुखापतीबाबत एक निवेदन जारी केलं आणि त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. माघारीमुळं लुकास कॉर्व्ही आणि रोनन लेबर या जोडीवरही परिणाम झाला, कारण त्यांचा जर्मन जोडीसोबतचा सामना आता अमान्य झाला आहे. जर्मन पुरुष दुहेरी खेळाडू मार्क लॅम्सफसनं गुडघ्याच्या दुखापतीमुळं ऑलिम्पिक गेम्स पॅरिस 2024 बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. लॅम्सफस आणि त्याचा साथीदार मार्विन सीडेलचे भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी/चिराग शेट्टी आणि फ्रान्सच्या लुकास कॉर्वे/रोनन लेबर यांच्या विरुद्ध सी गटातील उर्वरित सामने खेळवले जाणार नसल्याचं बीडीएफनं पोस्ट केलं आहे.