पॅरिस Paris Olympics 2024 Badminton : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. सिंधूनं महिला एकेरीच्या ग्रुप- M मध्ये पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 111व्या स्थानी असलेल्या मालदीवच्या फातिमाथ नबाहा अब्दुल रझाकचा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट 21-9 असा जिंकल्यावर दुसरा सेट 21-6 असा जिंकत मालदीवच्या रझाकवर एकहाती विजय मिळवला. सिंधूनं सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदकं जिंकली आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूकडून यंदा सुवर्णपदकाची सर्वांना अपेक्षा आहे.
दोन सामन्यांमधला दुसरा विजय : दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूनं पहिल्या सेटमध्ये 14 गुण मिळवले तर दुसऱ्या सेटमध्ये तिनं 18 गुण मिळवले. सिंधूचा मालदीवच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्धच्या दोन सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे. याआधी तिनं 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही मालदीवच्या फातिमाथ नबाहा अब्दुल रझाकवर सरळ सेटमध्ये विजय मिळवला होता.
सिंधूनं पहिला सेट 21-9 नं जिंकला : जागतिक क्रमवारीत 13व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या पीव्ही सिंधूनं पहिल्या सेटमध्ये संथ सुरुवात केली आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला अनेक सोप्या संधी दिल्या. सेटच्या सुरुवातीला स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता. मात्र यानंतर सिंधूनं मालदीवच्या खेळाडूला एकही संधी दिली नाही आणि मध्यांतरापर्यंत तिनं 11-4 गुणांसह 7 गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ब्रेकनंतर सिंधूनं चमकदार कामगिरी सुरु ठेवत पहिला सेट 21-9 असा जिंकला.