पॅरिस Paris Olympics 2024 : भारताची स्टार पॅडलर मनिका बत्रा ही टेबल टेनिसमधील राऊंड-16 साठी पात्र ठरणारी ऑलिम्पिक इतिहासातील पहिली भारतीय महिला टेबल टेनिस खेळाडू ठरली आहे. टेबल टेनिस महिला एकेरीच्या 32 फेरीच्या सामन्यात बत्रानं फ्रेंच खेळाडू प्रितिका पावडेचा 4-0 असा पराभव केला.
असा मिळवला विजय : मनिकाने महिला एकेरीच्या राउंड ऑफ 32 सामन्यात शानदार सुरुवात केली. 36 मिनिटं चाललेल्या या सामन्यात मनिकानं फ्रान्सच्या प्रितिका पावडेचा 11-9, 11-6, 11-9, 11-7 असा पराभव केला आणि राउंड- 16 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. जागतिक क्रमवारीत मनिका बत्रा 28 व्या स्थानावर आहे आणि प्रितिका पावडे मानिकापेक्षा दहा स्थानांनी वर आहे. मनिकानंं यापूर्वी 64 च्या फेरीत ब्रिटनच्या ॲना हर्सीचा पराभव केला होता. यामध्ये तिनं फक्त एक सेट गमावला होता. 32 च्या फेरीत मनिकाचा पुढील सामना हाँगकाँगच्या झू सी आणि जपानच्या एम हिरानोशी होईल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनिका बत्रा पदकाची दावेदार आहे. मात्र पदक जिंकण्यासाठी तिला नॉकआऊट सामन्यांमध्येही अशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल.