पॅरिस (फ्रान्स) Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला 27 जुलैपासून सुरुवात झाली. भारताला 10 मीटर एअर रायफल मिश्र संघाकडून पहिल्या दिवशी पदकाची अपेक्षा होती. मात्र ते भारताला पदक मिळवून देऊ शकलं नाही. तथापि, भारताची अव्वल नेमबाज मनू भाकरनं चमकदार कामगिरी करत 10 मीटर एअर पिस्तूल महिलांच्या वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली ही भारतासाठी आनंदाची बाब होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशानं पहिलं पदक जिंकलं ते जाणून घ्या.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कझाकिस्ताननं जिंकलं पहिलं पदक : कझाकस्ताननं 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या रुपात पहिलं पदक जिंकलं. 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत कझाकिस्ताननं जर्मनीचा 17-5 असा पराभव करत कांस्यपदक जिंकलं.
चीननं जिंकलं पहिलं सुवर्णपदक : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिलं सुवर्णपदक चीननं पटकावलं. चीनच्या मिश्रित नेमबाजी जोडी हुआंग युटिंग आणि शेंग लिहाओ यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या किम जिह्योन आणि पार्क हाजून या जोडीचा 16-12 असा पराभव करत शानदार सुरुवात केली.