पॅरिस :पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या हॉकी उपांत्य फेरीत भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी कट्टर प्रतिस्पर्धी जर्मनीशी भिडणार आहे. भारताच्या नजरा 44 वर्षांनंतर ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. मात्र यासाठी भारताला जर्मनीचं कठीण आव्हान परतवून लावावं लागणार आहे. या सामन्यात विजय मिळवताच भारताचं मेडल पक्कं होणार आहे.
दोन्ही संघांची कामगिरी :भारताने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर जर्मनी हॉकी संघ रविवारी उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा 3-2 असा पराभव करून येथे पोहोचला. आज दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना अपेक्षित आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड : इतिहासात भारत आणि जर्मनी यांच्यात आतापर्यंत एकूण 35 हॉकी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये जर्मनीचा वरचष्मा राहिला आहे. जर्मनीने 35 पैकी 16 सामने जिंकले आहेत. तर भारताने 16 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमध्ये खेळलेले 7 सामने अनिर्णित राहिले. मात्र, गेल्या 5 सामन्यांत भारताने जर्मनीचा 3 वेळा पराभव केला आहे.
टोकियो ऑलिम्पिक 2020 नंतर कोणाचं वर्चस्व? : 2020 मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने प्लेऑफमध्ये जर्मनीचा पराभव करून कांस्यपदक जिंकलं. या रोमांचक सामन्यात भारताने 5-4 असा विजय मिळवला होता. त्यानंतर एफआयएच प्रो लीगमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 6 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 5 सामने भारताने जिंकले आहेत.
ऑलिम्पिक खेळांमधील दोन्ही संघांची कामगिरी : ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय पुरुष हॉकी संघानं विक्रमी 8 सुवर्ण पदकांसह एकूण 12 पदकं जिंकली आहेत. त्याचबरोबर जर्मनी संघाने ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्णपदकं जिंकली आहेत.
उपांत्य फेरीचा सामना कधी, कोठे पाहता येणार? : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा हॉकी सेमीफायनल भारत आणि जर्मनी यांच्यात आज रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरू होईल. सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग जीओ सिनेमा वर केले जाईल. तसंच स्पोर्ट्स 18 नेटवर्क टीव्ही चॅनेलवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केलं जाईल.
हेही वाचा
- "ऑलिम्पिकमध्ये मेहनत करत नसाल तर..", दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण बॅडमिंटनपटूंच्या खराब कामगिरीवर संतापले - Paris Olympics 2024
- 'मराठमोळ्या' अविनाश साबळेनं पॅरिस गाजवलं; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय - Paris Olympics 2024
- जर्मनीला हरवून भारत पुन्हा एकदा इतिहास रचणार, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांचं मत - PARIS OLYMPICS 2024