महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताला मोठा धक्का... अंतिम सामन्यात पोहोचलेली कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकसाठी अपात्र, कारण काय? - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 : कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानं भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. यामुळं आता तिला अंतिम सामना खेळता येणार नाही.

vinesh phogat
विनेश फोगट (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 7, 2024, 12:18 PM IST

Updated : Aug 7, 2024, 12:51 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 : कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानं भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. तिचं वजन 50 किलोशी जुळत नसल्याचं सूत्रांनी आज सांगितलं. यामुळं आता तिला अंतिम सामना खेळता येणार नाही.

काही ग्रॅम वजन जास्त : भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं म्हटलं की, 'भारतीय संघ विनेश फोगटच्या 50 किलो महिला कुस्ती गटातून अपात्र ठरल्याची बातमी शेअर करत आहे, हे खेदजनक आहे. टीमनं रात्रभर केलेल्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, आज सकाळी तिचं वजन 50 किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त होतं. यावेळी संघाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही. भारतीय संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो. तिला पुढील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करायचं आहे.'

अंतिम फेरीत पोहोचत रचला होता इतिहास : विनेश फोगटनं प्रथमच कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला होता. अंतिम फेरी गाठणारी ती भारतातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली. यासह, तिनं तीन ऑलिम्पिकमध्ये भाग घेतल्यानंतर प्रथमच पदक मिळवलं होतं. तिच्या अपात्रतेनंतर आता प्रत्येक भारतीयाला मोठा धक्का बसला आहे. सूत्रांनी सांगितलं होतं की कुस्तीपटूचं वजन स्वीकार्य मर्यादेपेक्षा सुमारे 100 ग्रॅम जास्त होतं. ज्यामुळं तिला अपात्र ठरवलं जाऊ शकते. स्पर्धेच्या नियमांनुसार, फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही आणि परिणामी 50 किलोमध्ये सुवर्ण आणि कांस्यपदक विजेतेच सहभागी होतील.

अमेरिकन रेसलरशी होणार होता अंतिम सामना : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर ती सुवर्णपदक जिंकेल असा विश्वास वाटत होता. विनेश फोगटनं मंगळवारी महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव केला. विनेशची फायनल बुधवारी (7 ऑगस्ट) अमेरिकेच्या ॲन सारा हिल्डब्रँडशी होणार होती. यापूर्वी तिनं प्री-क्वार्टर फायनलमध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन आणि चार वेळा विश्वविजेती युई सुसाकीचा 50 किलोमध्ये पराभव केला होता.

हेही वाचा :

  1. भारताचं 44 वर्षानंतरचं स्वप्न भंगलं; हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा जर्मनीकडून पराभव, आता स्पेनविरुद्ध होणार लढत - Paris Olympics 2024 Hockey
  2. दंगल गर्ल विनेश फोगटची अंतिम फेरीत धडक, भारताचं एक पदक नक्की! - Vinesh Phogat News
Last Updated : Aug 7, 2024, 12:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details