नवी दिल्ली : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंकडून आतापर्यंत अनेक ऐतिहासिक पराक्रम पाहायला मिळाले आहेत. आता पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्येही ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. अविनाश साबळे यानं या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अविनाश ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला आहे. अविनाश पाचव्या क्रमांकावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.
अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील असून तो सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. याआधीच्या स्पर्धांमध्ये झालेल्या चुका बाजूला ठेवून अविनाशनं या या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. अविनाशनं 8 मिनिटं 15.43 सेकंदात पात्रता फेरी पूर्ण करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. याआधी ललिता बाबरनं रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
अविनाश जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर :अविनाशने फेरी 1 मधील हीट 2 मध्ये 8 मिनिटं 15.43 सेकंदात पात्रता फेरी पूर्ण करत पाचवं स्थान मिळवलं. अविनाश सध्या जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर आहे. या शर्यतीत मोरोक्कोच्या मोहम्मद टिंडौफतनं 8 मिनिटे 10.62 सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण तीन हीट होत्या आणि या तिन्ही हीटमध्ये 'अव्वल 5' मध्ये स्थान मिळवणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. अशाप्रकारे तीन हीट मधून एकूण 15 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
अविनाशने या शर्यतीत चांगली सुरुवात केली होती. पहिल्या 1000 मीटरपर्यंत तो अव्वल राहिला. मात्र 2000 मीटर पूर्ण करेपर्यंत तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला. साबळेनं 2000 मीटरचे अंतर 5 मिनिटे 28.7 सेकंदात पूर्ण केलं. शर्यत पूर्ण होईपर्यंत तो पाचव्या स्थानावर घसरला. मात्र पाचवं स्थान मिळवून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. आता अंतिम फेरीत अविनाश चमकदार कामगिरी करुन भारताला आणखी एक पदक जिंकून देईल, अशी भारतीय क्रीडाप्रेमींना आशा आहे.
हेही वाचा
- जर्मनीला हरवून भारत पुन्हा एकदा इतिहास रचणार, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांचं मत - PARIS OLYMPICS 2024
- भारतीयांचा हार्ट ब्रेक...! स्टार शटलर लक्ष्य सेन कांस्यपदक सामन्यात पराभूत - Paris Olympics 2024
- अनंतजीत आणि महेश्वरीला कांस्यपदकाची हुलकावणी; अवघ्या एका गुणानं पराभूत - Paris Olympics 2024