रावळपिंडी Pakistan Won Series Against England :पाकिस्तान आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रावळपिंडीत खेळला गेला. हा सामना जिंकत पाकिस्तान संघानं 2-1 नं मालिका जिंकली. पाकिस्तान संघासाठी ही मालिका खूप खास होती. कारण मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान संघात मोठे बदल करण्यात आले. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीसारख्या स्टार खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. याचा फायदा पाकिस्तान संघालाही झाला, सलग दोन सामने जिंकून संघानं मालिका जिंकली.
फिरकीत अडकले इंग्रज : पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज नोमान अली आणि साजिद खान यांनी सामन्यात इंग्लंडचं कंबरडं मोडलं. तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला अवघ्या 36 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. जे त्यांनी एका गड्याच्या मोबदल्यात गाठलं आहे. नोमानच्या 6 विकेट्स आणि साजिदच्या 5 विकेट्समुळं इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 112 रन्सवर आटोपला. गेल्या 4 डावांमध्ये दोघांनी 40 पैकी 39 विकेट घेतल्या आहेत. नोमान अली आणि साजिद खान यांनी इंग्लंडच्या शेवटच्या 4 डावांपैकी 3 डावात सर्व 10 विकेट घेतल्या आहेत. जाहिद महमूदनं रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या डावात एक विकेट घेतली. दोघांनी मिळून त्या डावात 9 विकेट घेतल्या होत्या.