दुबई PAK vs IND 5th Match Live Streaming : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाचवा सामना आज 23 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाईल. हा ग्रुप अ चा तिसरा सामना आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. क्रिकेट जगातातील हा सर्वात मोठा सामना मानला जातो.
दोन्ही संघांचा दुसरा सामना : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल. या स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवानच्या खांद्यावर आहे. हा सामना केवळ पॉइंट्स टेबलसाठी नाही तर अभिमान आणि सन्मानासाठी देखील महत्त्वाचा असेल. पहिल्या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशला 6 विकेट्सनं हरवून चांगली सुरुवात केली, तर पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गेल्या काही वर्षांत टीम इंडियानं पाकिस्तानविरुद्ध सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल तर पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरोचा असेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : आतापर्यंत टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये 135 सामने खेळले गेले आहेत, जे इतर कोणत्याही क्रिकेट फॉरमॅटच्या तुलनेत सर्वाधिक आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील वनडे सामन्यांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्ताननं आतापर्यंत 73 सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियानं 57 सामने जिंकले आहेत. याशिवाय, 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
दुबईत भारताचं वर्चस्व : टीम इंडियानं दुबईच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध 2 सामने खेळले आहेत. यात टीम इंडियानं दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं आहे. आता टीम इंडिया 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज आहे. तसंच आयसीसी स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 13 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात, टीम इंडियानं वरचढ कामगिरी केली आहे. टीम इंडियानं 13 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर, पाकिस्तान संघाला फक्त तीन सामने जिंकता आले आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण पाच वनडे सामने खेळले गेले आहेत. यात पाकिस्तान संघानं वरचढ कामगिरी केली आहे. पाकिस्ताननं पाच पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, टीम इंडियाला फक्त दोन सामने जिंकता आले आहेत.
दुबईची खेळपट्टी कशी असेल : भारत विरुद्ध बांगलादेश आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सामन्यादरम्यान दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही मदत करेल अशी अपेक्षा आहे. सुरुवातीला, नवीन खेळपट्ट्यांचा वापर केला जाणार असल्यानं परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल असेल. मात्र सामना पुढं सरकत असताना फलंदाज धावा काढू शकतात. पण फिरकीपटूंना खेळपट्टीवरुनही मदत मिळू शकते.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाचवा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?