नवी दिल्ली Champions Trophy 2025 in Pakistan : पाकिस्तानला पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं आयोजन करायचं आहे, ज्याबद्दल आधीच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार का असा प्रश्न उपस्थित होत असून, ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित केली जाण्याचीही शक्यता आहे. तरीही पाकिस्तान आपल्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) प्रमुखांनीच आपल्या देशातील क्रिकेट स्टेडियमचा पर्दाफाश केला असून पाकिस्तानचे स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं आयोजन करण्यास योग्य नसल्याचं म्हटलं आहे.
खुद्द पीसीबी अध्यक्षांनी केलं मान्य : सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संदर्भात पाकिस्तानातील लाहोर आणि कराचीसारख्या पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय आणि प्रमुख स्टेडियममध्ये काम सुरु आहे. पीसीबी स्पर्धेपूर्वी त्यांची तयारी करण्यात व्यस्त आहे, ज्यावर करोडो रुपये खर्च केले जात आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानी स्टेडियमची खराब स्थिती, ज्याबद्दल चाहते आणि प्रसारमाध्यमे यापूर्वी अनेकदा प्रश्न उपस्थित करत आहेत आणि आता खुद्द पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनीच हे मान्य केलं आहे.
1980 चे आहेत पाकीस्तानातील स्टेडियम : लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मोहसीन नकवी यांनी पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना उघडपणे आपली निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, पाकिस्तानच्या स्टेडियमची अवस्था आजही 1980 च्या दशकासारखीच आहे आणि जर एखाद्याला त्या काळात राहायचं असेल तर स्टेडियम्स चांगली दिसतील. पण, आजच्या युगानुसार ती कुठंही टिकत नाहीत. त्यांनी स्टेडियममध्ये चांगल्या जागा, स्वच्छतागृहे आणि इतर सुविधांच्या अभावाचा उल्लेख करत सांगितलं की, जगभरातील मोठ्या आधुनिक स्टेडियमच्या तुलनेत पाकिस्तानी स्टेडियम नाहीत. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज व्हावेत यासाठी अनेक स्टेडियमचे मोठे भाग पुन्हा बांधले जात आहेत, असं नकवी यांनी सांगितलं.
वेळोवेळी बदलावे लागतात मैदानं : मात्र, स्टेडियममधील बांधकामामुळं पाकिस्तानलाही अडचणी येत आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे 21 ऑगस्टपासून सुरु होणारी बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याबाबत बराच गदारोळ सुरु आहे. सुरुवातीला पीसीबीनं या सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, नंतर बांधकामाचं कारण देत प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घातली आणि हा सामना प्रेक्षकांशिवाय होणार असल्याचं जाहीर केलं. आता खेळाडू आणि कामगारांच्या सुरक्षेचा विचार करुन बोर्डानं सामना कराचीतून हलवण्याची घोषणा केली आहे. हा सामना आता रावळपिंडीतच खेळवला जाईल, जिथं पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
हेही वाचा :
- राशिद खाननं ऑस्ट्रेलियाच्या 'या' स्पर्धेतून घेतली माघार, आयपीएल खेळणार का? - Rashid Khan
- मोहम्मद शमी भारतीय संघात कधी परतणार? जय शाहांनी दिली मोठी अपडेट - mohammed shami