बुलावाये Pakistan 250 T20I Matches : आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघानं असा पल्ला गाठला आहे, जो आजपर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये कोणताही संघ गाठू शकलेला नाही. पाकिस्तानी संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे, जिथं ते यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून पाकिस्तान संघानं मालिकेत अजिंक्य आघाडी मिळवली आहे. त्याच वेळी, एका विशेष यादीमध्ये, भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघांपूर्वी पाकिस्ताननं असा आकडा गाठला जो आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतर कोणत्याही संघाला गाठता आला नव्हता. वास्तविक T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 सामने खेळणारा पाकिस्तान आता पहिला क्रिकेट संघ बनला आहे.
पाकिस्ताननं 250 सामने खेळले, भारत 8 सामने मागे : पाकिस्तानी संघानं T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 250 पैकी 145 सामने जिंकले आहेत, तर 98 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत पाकिस्तान संघ पहिल्या स्थानावर आहे, त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांनी आतापर्यंत 242 सामने खेळले आहेत. पाकिस्तानला 2024 मध्ये अजून चार T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. 2024 हे वर्ष पाकिस्तानी संघासाठी चढ-उतारांनी भरलेलं आहे, ज्यात त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, तर T20 विश्वचषक स्पर्धेत हा संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता.