इस्लामाबद Pakistan Team New Batting Coach : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अलीकडेच माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेदची चॅम्पियन्स ट्रॉफी-2025 पर्यंत पाकिस्तानच्या वनडे आणि T20 क्रिकेट संघाचा अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. जावेद निवडकर्ता म्हणूनही काम करत राहणार आहे. अशा स्थितीत त्याला दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. आता पाकिस्तानच्या वनडे आणि T20 क्रिकेट संघाला नवा फलंदाजी प्रशिक्षक मिळाला आहे. पीसीबीनं फलंदाजी प्रशिक्षकाची निवड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या खेळाडूला पीसीबीनं ही जबाबदारी दिली आहे.
पाकिस्तानी संघाला मिळाला नवीन फलंदाजी प्रशिक्षक : पाकिस्तानचा संघ नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. यात पाकिस्तानच्या फलंदाजांकडून अत्यंत खराब खेळ पाहायला मिळाला. विशेषत: T20 मालिकेत सर्व फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले. अशा परिस्थितीत आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (पीसीबी) शाहिद अस्लमला राष्ट्रीय वनडे आणि T20 संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. अस्लम हा एक पात्र प्रशिक्षक आहे, त्यानं अनेक वर्षे सहाय्यक प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि सहाय्यक व्यवस्थापक यासह विविध पदांवर पाकिस्तान संघात काम केलं आहे.
आधीही केलं फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम : गेल्या दोन वर्षांपासून शाहिद अस्लम लाहोरमधील हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये कोचिंग पदावर कार्यरत आहे. आता प्रशिक्षक आकिब जावेद यांच्या सूचनेनुसार अस्लमला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून आणण्यात आलं आहे. याआधी माजी कसोटी कर्णधार मोहम्मद युसूफ पाकिस्तान संघात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होता आणि त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघाचा निवडकर्ता बनवण्यात आलं. मात्र युसूफनं दोन्ही पदांचा राजीनामा दिला होता. तो आता हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये कार्यरत आहे. युसूफनं नुकताच हाय परफॉर्मन्स सेंटरमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, परंतु पीसीबीनं त्याचा राजीनामा फेटाळला आहे.
शाहिद अस्लमची क्रिकेट कारकीर्द : शाहिद अस्लम आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसला तरी तो देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. त्यानं 17 प्रथम श्रेणी आणि 16 लिस्ट ए सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये त्यानं 367 धावा केल्या आहेत आणि 34 बळीही घेतले आहेत. त्याचबरोबर लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर 205 धावा आणि 12 विकेट आहेत. हे सामने त्यानं 1994 ते 2000 दरम्यान खेळले. 55 वर्षीय अस्लम तेव्हापासून कोचिंगच्या जगात सक्रिय आहे. आता तो झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात सामील होऊ शकतो. 24 नोव्हेंबरपासून हा दौरा सुरु होणार आहे.
हेही वाचा :
- BGT मालिकेपूर्वी विराटची निवृत्ती...? कोहलीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, चाहत्यांमध्ये संभ्रम
- न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर भारतीय संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वात कांगारुंना हरवणार? ऐतिहासिक सामना 'इथं' पाहा लाईव्ह