पुणे Highest Run Chased by India in Test :भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) सुरु आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला 359 धावांचं लक्ष्य मिळालं आहे. अशा परिस्थितीत भारतीय भूमीवर केवळ एकदाच 350 हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात आला असला तरी भारतीय संघ या लक्ष्याचा पाठलाग करु शकेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारतीय संघाला करावी लागणार इतिहासाची पुनरावृत्ती : न्यूझीलंडनं पहिल्या डावात 259 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 156 धावाच करु शकला. पहिल्या डावाच्या आधारे न्यूझीलंडकडं 103 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघ 255 धावांत सर्वबाद झाला. एकूणच भारतीय संघाला चौथ्या डावात 350 हून अधिक धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. चौथ्या डावात इतक्या धावा करणं सोपं नसलं तरी अशक्य मात्र नाही.
भारतानं एकदाच केला 350 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग : भारतीय भूमीवर केवळ एकदाच कसोटी क्रिकेटमध्ये 350 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे पार केलं गेलं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं हा इतिहास रचला. डिसेंबर 2008 मध्ये चेन्नईमध्ये भारतानं इंग्लंडविरुद्ध 387 धावांचं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं होतं. त्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शतक (नाबाद 103 धावा) केलं होतं आणि भारतीय संघ हा सामना सहा गडी राखून जिंकण्यात यशस्वी ठरला होता.
सेहवागची आक्रमक खेळी : मात्र, सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 68 चेंडूत 83 धावा केल्या होत्या. ज्यात 11 चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. सेहवागच्या त्या वादळी खेळीनं भारतीय संघाला गती दिली होती. युवराज सिंग (नाबाद 85) आणि दुसरा सलामीवीर गौतम गंभीर (66 धावा) यांनीही अर्धशतकी खेळी खेळली. त्या तुफानी खेळीसाठी सेहवागची 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवड करण्यात आली होती.