रावळपिंडी PAK vs ENG 3rd Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत असतानाच पाकिस्तानचा संघही आजपासून रावळपिंडी इथं इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळण्यासाठी आला आहे. रावळपिंडी कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, या सामन्याच्या खेळपट्टीबद्दल आधीच अंदाज लावला जात होता की ती फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरेल आणि त्यामुळंच पाकिस्तान संघानं सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजांसह गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह, पाकिस्तान संघानं कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच अशी कामगिरी केली आहे, जी केवळ भारतीय संघ आणि बांगलादेश संघानं केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाकिस्ताननं पहिल्या दिवशी 2 फिरकीपटूंसह केली सुरुवात : पाकिस्तानी संघाचा कर्णधार शान मसूदनं नाणेफेक हरल्यानंतर आपल्या दोन्ही फिरकी गोलंदाजांसह गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह मसूदचं नाव कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशा यादीत सामील झालं ज्यात पाकिस्तानच्या कोणत्याही कर्णधाराचा समावेश नव्हता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच, भारतीय संघानं 1964 साली इंग्लंडविरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजांसह गोलंदाजी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर 2018 आणि 2019 मध्ये बांगलादेश संघानं असंच काही केलं. आता असंच पाकिस्तान संघाकडून पाहायला मिळालं आहे.