वेलिंग्टन NZ vs ENG 2nd Test :न्यूझीलंड आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लिश संघाने जिंकला होता, तर आजपासून वेलिंग्टनच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. ज्यात पुन्हा एकदा हॅरी ब्रूकनं शतक ठोकत इंग्लंड संघाला वाचवलं.
इंग्लंडचा पहिला डाव 280 धावांवरच आटोपला :दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान कीवी संघानं नाणेफेक जिंकत पाहुण्या इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजीचं आंमंत्रण दिलं. यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 280 धावांवर संपुष्टात आला. इंग्लीश संघाकडून हॅरी ब्रूकनं पुन्हा एकदा शतकी खेळी करत 123 धावा केल्या आणि ऑली पोपनं 66 धावा केल्या. याशिवाय इंग्लंड संघाच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आलं नाही. तर किवी संघाकडून गोलंदाजीत नॅथन स्मिथनं 4, विल्यम ओ'रुर्कनं 3 तर मॅट हेन्रीनं 2 विकेट्स घेतल्या.
हॅरी ब्रुकनं केला पराक्रम : या सामन्यात हॅरी ब्रूकनं केवळ 123 धावांची खेळीच खेळली नाही तर कसोटी कारकिर्दीतील अवघ्या 23व्या कसोटी सामन्यात त्यानं 8वं शतक झळकावलं. सध्याचा काळ पाहिला तर ब्रुकनं या बाबतीत अनेक महान खेळाडूंना मागं टाकलं आहे. ब्रूक जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा इंग्लंडच्या संघाची अवस्था खूपच वाईट होती, त्यांचे अवघ्या 43 धावांत चार खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते, इथून ब्रूकनं इंग्लंड संघाच्या डावाची धुरा सांभाळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
जलद 8 कसोटी शतकं करणारा 9वा फलंदाज : हॅरी ब्रूकनं 2024 साली कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे, ज्यात त्यानं या वर्षात आतापर्यंत एक हजार कसोटी धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूक हा डॉन ब्रॅडमनच्या दिग्गजांच्या यादीत सामील होऊन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 8 शतकं झळकावणारा फलंदाज बनला आहे. ब्रूकनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील 38व्या डावात हा पराक्रम केला. यासह, तो 2024 साली कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज बनला आहे, ज्यात त्याच्याआधी जो रुट, यशस्वी जैस्वाल आणि बेन डकेट यांनी ही कामगिरी केली होती. हॅरी ब्रूकची परदेशी भूमीवर कसोटी कारकिर्दीतील ही 16वा कसोटी सामना होता, ज्यात तो सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू ठरला आहे. असं करुन त्यानं डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. डॉन ब्रॅडमन यांनी परदेशी भूमीवर 16 डावांत 6 शतकं झळकावली होती.
हेही वाचा :
- 'साहेबां'विरुद्ध पराभवाचा बदला घेण्यासाठी 'कीवीं'नी सामन्याच्या 24 तासाआधीच केली 'प्लेइंग इलेव्हन'ची घोषणा
- कीवी संघ पराभवाचा बदला घेणार की इंग्रज मालिका जिंकणार? निर्णायक सामना 'इथं' पाहा लाईव्ह