हॅमिल्टन NZ vs SL 2nd ODI Live Streaming : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. यातील दुसरा सामना 08 जानेवारी (बुधवार) रोजी सिडन पार्क हॅमिल्टन इथं खेळवला जाईल. न्यूझीलंडनं मालिकेतील पहिला सामना 9 विकेटनं जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळं हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा कीवी संघाचा प्रयत्न असेल तर 10 वर्षांनंतर सामना जिंकत मालिकेत बरोबरी करण्याचा पाहुण्या श्रीलंकन संघाचा प्रयत्न असेल.
पहिल्या सामन्यात काय झालं : पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटरनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करायला आलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही आणि त्यांचा डाव 43.4 षटकांत 178 धावांत संपुष्टात आला. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघानं T20 स्टाईलनं फलंदाजी करत अवघ्या 26.2 षटकांत 180 धावा केल्या आणि सामना 9 गडी तसंच 142 चेंडू शिल्लक ठेवत जिंकला. न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगनं 95 धावांची शानदार नाबाद खेळी खेळली. त्यानं 86 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीनं ही खेळी खेळली.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात एकूण 106 सामने खेळले गेले आहेत. यापैकी न्यूझीलंडनं 53 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेनं 43 वेळा विजय मिळवला आहे. 9 सामने निकालाशिवाय संपले, तर 1 सामना बरोबरीत राहिला. दोन्ही संघांमधील सामना नेहमीच रोमांचक राहिला आहे, ज्यात कधी न्यूझीलंडनं वर्चस्व दाखवलं आहे तर कधी श्रीलंकेनं चमकदार कामगिरी केली आहे. वनडे फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांमधील हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी नेहमीच खास राहिला आहे.
2015 मध्ये जिंकला शेवटचा सामना :न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात 1979 मध्ये पहिला वनडे सामना खेळवण्यात आला. यानंतर नेहमीच हे दोन्ही संघ एकमेकांच्या देशाचा दौरा करत आहेत. मात्र श्रीलंकेला न्यूझीलंडमध्ये वनडे सामना जिंकण्यासाठी संघर्ष कारावा वागत असल्याचं दिसत आहे. त्यांनी 31 डिसेंबर 2015 रोजी श्रीलंकेत शेवटचा सामना जिंकला होता. त्यामुळं आता 10 वर्षांनंतर वनडे सामना जिंकण्यासाठी लंकन संघ मैदानात उतरणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं होणार आहे?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना 08 जानेवारी (बुधवार) रोजी सिडन पार्क हॅमिल्टन इथं भारतीय वेळेनुसार सकाळी 06:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक सकाळी 06:00 वाजता होईल.