शिर्डी - नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनवर केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघतय. निलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनीही उमेदवारीसाठी निलम गोऱ्हे यांना पैसे दिल्याचा गंभीर आरोप केलाय. यानंतर शिंदे शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनीसुद्धा विनायक पांडे यांच्यावर तोफ डागलीय.
अजय बोरस्ते ऑन विनायक पांडे - खरंतर विनायक पांडे हे माजी महापौर आहेत. ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना अशा पद्धतीनं पैसे द्यावे लागतात ही बाबच खेदजनक आहे. परंतु यात मला काहीही तथ्य वाटत नाही अशा पद्धतीनं पैसे देऊन तिकीट शिवसेनेत दिलं जात नाही. नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही. मात्र तिकीटांसाठी पैसे द्यावे लागतात असं मला वाटत नाही आणि असं मला कधीही जाणवलं नाही. आम्ही एकनाथ शिंदेसोबत का आलो, कारण ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची खऱ्या अर्थाने शिवसेना आहे. येथे काम करणाऱ्या माणसांना संधी आहे, येथे आलेले लोक काम करणारे आहेत. मुळात एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांतून मोठे झालेले नेतृत्व आहे. त्यांना कार्यकर्त्यांची जाणीव आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला मान जर कुठे असेल तर ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. समोरच्या शिवसेनेची अवस्था आपण पाहत आहात. नीलमताई जे काही बोलल्या त्यात तथ्य असू शकतं. संजय राऊत जेवढे बोलतील तेवढं ऑपरेशन टायगर सोपं होईल.
आज शिर्डीत शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीसाठी बैठक घेण्यात आली. यानंतर उपनेते अजय बोरस्ते यांनी माध्यमांशी संवाद साधलाय.