बेंगळुरु After 36 Years New Zealand Won test Match in India : भारतीय क्रिकेट संघाचा पराभव करत न्यूझीलंडनं बंगळुरु कसोटी सामना जिंकला आहे. यासह कीवी संघानं इतिहासही रचला. त्यांनी 36 वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी सामन्यातील विजयाची पटकथा लिहिली. न्यूझीलंडनं 1988 मध्ये भारतात शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. मुंबईच्या वानखेडे मैदानावरील विजयानंतर पहिल्यांदाच कीवी संघानं भारतात कसोटी विजयाचा झेंडा फडकावला आहे. बेंगळुरु कसोटीत न्यूझीलंडनं भारतीय संघाचा 8 विकेट्सनं पराभव केला. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
न्यूझीलंडनं 107 धावांच्या लक्ष्याचा केला पाठलाग :भारतीय संघानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. किवी संघाच्या 10 विकेट्स होत्या आणि ही धावसंख्या गाठण्यासाठी संपूर्ण दिवसाचा खेळ शिल्लक होता. अशा स्थितीत ते विजयाचे प्रबळ दावेदार होते आणि अगदी तसंच घडलं. न्यूझीलंडनं केवळ 2 विकेट्स गमावून सामना जिंकला.
रचिन आणि यंगनं दिला ऐतिहासिक विजय मिळवून : विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी मिळून न्यूझीलंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. 21व्या शतकातील न्यूझीलंडचा भारतीय भूमीवरील हा पहिला विजय आहे. कारण 1988 मध्ये शेवटचा विजय नोंदवल्यानंतर न्यूझीलंडनं भारतात कधीही कसोटी जिंकली नव्हती. पण, ही प्रतीक्षा आता संपली आहे.