ZIM vs AFG: 6 वाईड, एक नो-बॉल... गोलंदाजानं एका ओव्हरमध्ये टाकले 13 चेंडू
झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात अफगाणिस्तानला 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात एका चेंडूनं त्याला 6 कायदेशीर चेंडू टाकण्यासाठी 13 चेंडू टाकले.
हरारे 13 Ball Over : झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघ यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळला गेला. हा सामना जिंकून यजमान झिम्बाब्वे संघानं मालिकेत विजयानं सुरुवात केली. हा कमी धावसंख्येचा सामना होता ज्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. पण या सामन्यात असं काही पाहायला मिळालं, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्वचितच घडतं. खरं तर, सामन्यादरम्यान, अफगाणिस्तानच्या एका गोलंदाजाला त्याचं ओव्हर पूर्ण करण्यासाठी 13 चेंडू टाकावे लागले, कारण या गोलंदाजानं त्याची लाइन आणि लेन्थ गमावली होती.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजानं 1 षटकात टाकले 13 चेंडू : अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकसाठी हा सामना एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता. नवीन उल हक हा अफगाणिस्तानचा T20 फॉरमॅटमधील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे, पण हा दिवस त्याचा नव्हता. वास्तविक, झिम्बाब्वेच्या डावात नवीन उल हकनं 15 वं षटक टाकलं, या षटकात त्याला 6 कायदेशीर चेंडू टाकण्यासाठी 13 चेंडू टाकावे लागले. यात नवीन उल हकनं 6 वाईड बॉल आणि 1 नो बॉल टाकला, ज्यामुळं त्यानं या षटकात एकूण 19 धावा खर्च केल्या.
कसं टाकलं षटक : नवीन उल हकनं षटकाची सुरुवात वाईडनं केली आणि नंतर षटकाच्या पहिल्या कायदेशीर चेंडूवर 1 धाव खर्च केली. यानंतर नवीननं दुसरा चेंडू नो बॉल टाकला, ज्यावर चौकारही आला. पण फ्री हिट बॉल टाकण्यापूर्वी त्यानं सलग 4 वाईड बॉल टाकले. यानंतर फ्री हिटवरही चौकार लागला. मात्र, ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर त्याला यश मिळालं. यानंतरही तो योग्य लाइन आणि लेन्थमध्ये गोलंदाजी करु शकला नाही. पुढच्या दोन चेंडूंवर त्यानं 2 धावा दिल्या, परंतु पुन्हा एकदा वाईड बॉल टाकला, त्यानंतर तो ओव्हरचा शेवटचा कायदेशीर चेंडू टाकण्यात यशस्वी झाला, ज्यावर 1 धाव आली. अशा स्थितीत त्यानं 6 कायदेशीर चेंडूत 13 चेंडू टाकले.
शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वेनं जिकंला सामना : या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांना मोठी धावसंख्या फलकावर लावता आली नाही. अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 144 धावा करु शकला. त्याचवेळी, झिम्बाब्वेसाठीही हे धावांचं आव्हान सोपं नव्हतं, त्यांनी सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत विजय मिळवला. मात्र, एका खराब षटकाव्यतिरिक्त नवीन उल हकनं चांगली गोलंदाजी करत 4 षटकांत 33 धावांत 3 बळी घेतले, पण ते एकच षटक पराभवाचं कारण ठरले, अन्यथा निकाल वेगळा असू शकला असता.