मुलतान Hat-trick in Test Cricket :पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून मुलतान इथं खेळवला जात आहे. आज सुरु झालेल्या या सामन्यात 38 वर्षीय नोमान अलीनं आपल्या घातक गोलंदाजीनं वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर कहर केला. त्यानं सामन्याच्या पहिल्याच दिवशी हॅटट्रिक घेऊन इतिहास रचला. कसोटीत अशी कामगिरी करणारा तो पहिला पाकिस्तानी फिरकी गोलंदाज आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नोमनच्या फिरत्या चेंडूंना त्याच्या फलंदाजांकडं उत्तर नव्हतं. परिणामी ते 163 धावांवर सर्वबाद झाले आहेत. एकवेळ त्यांची अवस्था 7 बाद 47 होती, मात्र तळाच्या फलंदाजांनी केलेल्या चांगल्या फलंदाजीनं त्यांना दीडशे धावांचा पल्ला गाठता आला.
मुलतानमध्ये नोमाननं दाखवला फिरकीचा 'जादू' :कर्णधार शान मसूदसाठी नोमान अली ट्रम्प कार्ड म्हणून उदयास आला आहे. म्हणूनच त्यानं मुलतान कसोटीच्या पहिल्या दिवशी आठव्या षटकात चेंडू त्याच्या हाती दिला. यानंतर, नोमननं आपल्या फिरकी गोलंदाजीची जादू दाखवली आणि त्याच्या दुसऱ्या षटकात एक विकेट घेतली. यानंतर, तो डावाच्या 12व्या षटकात गोलंदाजी करायला आला आणि एकामागून एक 3 बळी घेत इतिहास रचला. त्यानं षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर जस्टिन ग्रीव्हज, टेविन इमलाच आणि केविन सिंक्लेअर यांना बाद करुन आपली हॅटट्रिक पूर्ण केली. कसोटीत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पाकिस्तानी फिरकी गोलंदाज बनला आहे.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचं सरेंडर : पाकिस्तान संघानं फिरकी गोलंदाजीच्या रुपात कसोटी क्रिकेटमध्ये विजयासाठी एक नवीन सूत्र शोधलं आहे. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धही हेच वापरलं. पाकिस्तानच्या या सूत्रासमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. कर्णधार शान मसूदनं टर्निंग ट्रॅकवर पहिल्याच षटकापासून फिरकी आक्रमणाला सुरुवात केली. त्यानं ऑफस्पिनर साजिद खानकडून डावाची सुरुवात केली. पहिली विकेट कासिफ अलीला मिळाली. पण यानंतर फिरकीपटूंनी कहर केला. साजिद खाननं 2, नोमान अलीनं 3 आणि लेगस्पिनर अबरार अहमदनं 1 विकेट घेतली. अशाप्रकारे, पाकिस्ताननं वेस्ट इंडिजच्या 8 फलंदाजांना फक्त 54 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
पाचव्यांदा घडला मोठा पराक्रम : पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट इतिहासात हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम 5 वेळा झाला आहे. नोमान अली याच्यापूर्वी वसीम अक्रम, मोहम्मद सामी आणि नसीम शाह यांनी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. कसोटीत 2 हॅट्रिक घेण्याचा विक्रम वसीम अक्रमच्या नावावर आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 43 गोलंदाजांनी 47 हॅट्रिक घेतल्या आहेत. यापैकी फक्त 4 गोलंदाज असे आहेत ज्यांनी 2 कसोटी हॅटट्रिक घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचे ह्यू ट्रंबल आणि जिमी मॅथ्यूज हे प्रत्येकी दोन हॅटट्रिक घेणारे पहिले गोलंदाज होते. यानंतर, वसीम अक्रम आणि इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड यांनी कसोटीत 2 हॅट्रिक घेण्याचा मोठा टप्पा गाठला.
हेही वाचा :
- पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कांगारुंचा संघ पोहोचला श्रीलंकेत
- एकाच बॉलवर आउट होणार 2 फलंदाज... क्रिकेटमध्ये येणार 4 नवे क्रांतिकारी नियम