मेलबर्न AUS vs IND 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील मेलबर्न कसोटी सामन्यात 4 दिवसांचा खेळ पूर्ण झाला असून सामना एका रोमांचक वळणावर आला आहे. सामन्याचा चौथा क्वार्टर भारतीय गोलंदाजांच्या नावावर होता, ज्यांनी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जास्त वेळ मैदानावर टिकू दिलं नाही. पण दिवसाच्या शेवटच्या 18 षटकांमध्ये असं काही घडलं ज्याची भारतीय चाहत्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. परणामी पुन्हा एकदा हा सामना भारतीय संघापासून दूर गेला आहे. यामागचं कारण आहे नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
मेलबर्नमध्ये भारताचं काय झालं? : मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव 369 धावांवर संपला आणि ऑस्ट्रेलियानं 105 धावांची आघाडी घेतली. पण ऑस्ट्रेलियाची अव्वल फळी दुसऱ्या डावात फार काही करु शकली नाही. त्यांनी सातत्यानं विकेट गमावल्या, त्यामुळं ऑस्ट्रेलियाचे 9 फलंदाज 173 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. अशा स्थितीत नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड यांनी मैदानावरील शेवटच्या जोडीची जबाबदारी सांभाळली, मात्र चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ही जोडी फोडण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आलं.
दहाव्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी : नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड यांच्यात 110 चेंडूत 10व्या विकेटसाठी आतापर्यंत 55 धावांची भागीदारी झाली आहे. हे दोन्ही खेळाडू खेळाच्या पाचव्या दिवशीही फलंदाजी करतील. त्यामुळं भारताचं लक्ष्य मोठं होत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं ही जोडी फोडण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र एकाही गोलंदाजाला हे जमलं नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजही अपयशी ठरले, त्यामुळं भारताचं टेन्शन वाढलं आहे.